नवी मुंबई | 14 सप्टेंबर 2023 : आजकाल गुन्ह्यांच्या नवनव्या पद्धती समोर येत असून सायबर फ्रॉडमुळे (cyber fraud) अनेक लोकांना मेहनतीची कमाई गमवावी लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशीच एक फसवणुकीची घटना नवी मुंबईत घडल्याचे समोर आले आहे. तेथे राहणाऱ्या एका व्यक्तीला ऑनलाइन जॉबचे आमिष दाखवत त्याची फसवणूक (scam) करण्यात आले आहे. फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी पीडित इसमाकडून तब्बल 18 लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. यानंतर तरूणाने पोलिसांत धाव घेत आपबिती सांगितली.
मंगळवारी नवी मुंबईतील सायबर पोलिस ठाण्यात या संदर्भात एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला. ऑनलाइन फ्रॉडला बळी पडलेल्या, पीडित इसमाने दाखल केलेल्या तक्रारीवर एफआयआर आधारित आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, काही वेबसाइट्स आणि सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर काही कामे किंवा टास्क पूर्ण करण्यासाठी त्याला (ऑनलाइन) नोकरीची ऑफर देण्यात आली होती. सुरूवातील ते टास्क पूर्ण झाल्यानंतर मोबदला म्हणून त्याला पैसे देण्यात आले होते. मात्र नंतर (तुला) चांगला परतावा मिळेल, असे आमिष देते पीडित इसमाला काही टास्क्ससाठी पैसे भरण्यास सांगण्यात आले. त्यांच्यावर विश्वास ठेऊन पीडित तरूणाने एकूण 18.36 लाख रुपयांची रक्कम भरली खरी, पण त्याला या गुंतवणुकीवर कधीच परतावा मिळाला नाही. ना त्याने भरलेले रक्कम परत मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसांकडे धाव घेतली .
यापूर्वीही ऑनलाइन फ्रॉडच्या अशा अनेक घटना घडल्या असून त्यामध्ये लोकांनी त्यांची मेहनतीची कमाई गमवावी लागल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच गुजरातच्या अहमदामध्ये एका शेअर ब्रोकरला बदमाशांनी कोट्यावधींचा चुना लावला होता. वेगवेगळ्या अज्ञात व्यक्तींनी ‘टास्क फ्रॉड’करून त्याची सुमारे 2.50 (अडीच कोटी) कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले होते.