पनवेल | 5 ऑक्टोबर 2023 : छोट्या-मोठ्या कारणांवरून वाद घालत, हाणामारीच्या घटना (crime news) दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. कारला धक्का लागल्याने काही तरूणांनी एका ट्रकचालकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच पनवेलमध्येही असाच प्रकार घडला आहे. एका पेट्रोल पंप चालकाला काही तरूणांनी बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. तरूणांचा हा धिंगाणा सीसीटीव्हीमध्ये कैद (capured in CCTV) झाला आहे.
क्षुल्लक कारणावरून झाला वाद
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल तालुक्यातील काळुंद्रे गावाजवळ जुन्या मुंबई पुणे महामार्गावर ही घटना घडली. तेथे असलेल्या एका पेट्रोल पंपावर तीन तरूण गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी थांबले होते. त्यावेळी तरूणांनी तेथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
हे तरूण पेट्रोल भरण्यासाठी उभे होते, तेव्हा किती रुपयांचे पेट्रोल भरायचे आहे, असा प्रश्न कर्मचाऱ्याने विचारला. मात्र त्या तरूणांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये अचानक वाद सुरू झाला. त्या तिनही तरूणांनी पेट्रोल पंपावरील त्या कर्मचाऱ्याचा शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. वाद वाढत गेल्यावर त्या तिघांनी त्याला मारहाण करत बेदम चोपही दिला.
हे दृश्य पाहून इतर कर्मचारी भांडण थांबवण्यासाठी पुढे आले, मात्र त्या तरूणांनी कोणाचेच ऐकले नाही. त्यांचा वाद आणि मारामारी सुरूच होती. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्या कर्मचाऱ्याच्या खिशात असलेली 7 हजार रुपयांची रोख रक्कमही लंपास केली. तरूणांचा हा सर्व धिंगाणा, वाद, मारामारी तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
या सर्व प्रकारानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तीनही तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका तरूणाला अटक करण्यात आली असून इतर दोघांचा अद्याप शोध सुरू असल्याचे समजते.
कारला धडक दिल्यावरून ट्रकचालकाला मारहाण, दुर्दैवी मृत्यू
एक भांडण मुंबई अहमदाबाद महामार्गावर पेटलं आणि त्यामध्ये निष्पाप व्यक्तीला जीव गमवावा लागला. कारला ट्रकचा किरकोळ धक्का लागल्याने हा वाद सुरू झाला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. चौघा जणांनी चालकास बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई हद्दीत मालजीपाडा जवळ एस पी ढाबा समोर, गुजरात लेन वर एका गॅस टँकरची मारुती सुझुकी कारला धडक बसली. त्यानंतर कामधील चौघा जणांनी ट्रकचालक रामकिशोर कुशावह याला जाब विचारत नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र ट्रकचालकाने पैसे देण्यास नकार दिला. माझ्याविरोधात गुन्हा दाखल करा आणि इन्शुरन्सच्या पैशांतून नुकसान भरपाई घ्या, असे त्याने सुनावले. मात्र हे ऐकताच आरोपींना राग आला आणि संतापाच्या भरात त्यांनी ट्रकच्या काचेवर दगडफेक केली. तसेच ट्रकचालक कुशावह याला ठोसे, बुक्के मारत बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ट्रकचालकाचा मृत्यू झाला.