मुंबई | 5 डिसेंबर 2023 : विवाहीत महिलेशी प्रेमसंबंध ठेवून, खासगी क्षणी ‘तसले’ फोटो काढून, त्याच फोटोंच्या आधारे प्रेयसीला ब्लॅकमेल करणाऱ्या आणि तिच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या आरोपी प्रियाकराला पोलिसांनी अखेर इंगा दाखवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गोवंडी येथील 22 वर्षीय तरूण आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात खंडणी, मारहाण, धमकी देणे याबद्दल गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.
गोवंडीतील शिवाजी नगर येथील 32 वर्षीय महिलेने रविवारी पोलिस स्टेशन गाठून सर्व प्रकार कथन करत तक्रार दाखल केली होती. ती महिला विवाहीत असून पती आणि दोन मुलासंह ती राहते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची चार वर्षांपूर्वी आरोपी अक्षय सिंह याच्याशी ओळख झाली आणि 2021 त्यांचे विवाहबाह्य संबंध सुरू झाले. बेरोजगार असलेला अक्षय हा पीडित तरूणीकडून बऱ्याच वेळा पैसे घ्यायचा. गेल्या चार वर्षांपासून ती अक्षयला खर्चासाठी दर महिन्याला 10,000 रुपये द्यायची.
रिलेशनशिपमध्ये असताना त्यांनी एकमेकांसोबत अनेक फोटो काढले. नात्याला दोन वर्ष झाल्यानंतर अक्षयची पैशाची मागणी वाढू लागली. मात्र पीडितेने त्याला पैसे देण्यास टाळाटाळ केल्यावर किंवा नकार दिल्यावर आपले ‘तसले’ फोटो तुझ्या नवऱ्याला पाठवेन, अशी धमकी देत अक्षयने तिला ब्लॅकमेल केले. यामुळे भेदरलेल्या, घाबरलेल्या पीडितेने त्याला पैसे देणे सुरूच ठेवले, त्यासाठी प्रसंगी तिने दुसऱ्यांकडून काही पैसे उधारही घेतले. तसेच तिचे 5 लाख रुपयांचे दागिनेही विकले. एका क्षणी त्याच्या मागण्यांना कंटाळून पीडितेने अक्षयसोबत असलेलं नातं संपवलं, पण त्याच्या मागण्या काही थांबेनात.
घरात डांबून केली मारहाण
30 नोव्हेंबर रोजी आरोपीने पीडितेला त्याच्या गोवंडी येथील फ्लॅटवर बोलावलं. तिथे गेल्यावर त्याने पीडितेकडून 20 हजार रुपये मागितले. मात्र आपल्याकडे एवढे पैसे नसल्याचे पीडितेने सांगताच आरोपीअक्षय आणि त्याची मावशी सुनीता यांनी तक्रारदार महिलेला घरात पहाटेपर्यंत डांबून ठेवले. तसेच लाकडी दांडा व पट्ट्याने मारहाण केली. यावेळी सिंहची मावशी सुनीता आणि आणखी एका महिलेनेही तक्रारदार महिलेला लाथाबुक्क्याने मारहाण केली.
अखेर पहाटे 4:30 च्या सुमारास सगळे झोपलेले असताना पीडितेने स्वत:ची कशीबशी सुटका केली आणि ती तेथून पळाली. घरी येऊन तिने तिच्या पतीला गेल्या काही वर्षात घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. पतीने तिचे म्हणणे ऐकून घेतले आणि तिला धीर दिला. त्यानंतर रविवारी दोघांनीही शिवाजी नगर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी सिंह, त्याची मावशी सुनीता व लक्ष्मी यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. २०१२ सालापासून आरोपीने पीडितेकडून एकूण १७ लाख रुपये उकळल्याचे तपासात समोर आले. अखेर पोलिसांनी तपास करत आरोपी अक्षय सिंह याला अटक केली.