रवी खरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी,नवी मुंबई | 27 ऑक्टोबर 2023 : चोरी.. आपल्या मालकीची नसलेली, दुसऱ्याची एखादी गोष्ट त्याच्या संमतीशिवाय घेणं. याला सरळ उचलेगिरी किंवा कायदेशीर भाषेत चोरी (theft) म्हणता येऊ शकेल. ही काही फारशी भूषणावह गोष्ट नाही. पण बरेच जण पोटापाण्यासाठी चोरीचा हा मार्ग (crime news) निवडतात. पण काही इसम असेही असतात जे फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी, ऐशोरामासाठी चोरी, लूटमार करतात , दरोडाही टाकतात. पैशांचा हव्यास, मस्त, निवांत आरामशीर आयुष्य जगण्यासाठी, सोप्या, झटपट पण चुकीच्या मार्गाने पैसे मिळवणारे हे भामटे कधी ना कधी कायद्याच्या कचाट्यात अडकतातच.
असाच एक अतरंगी चोर नवी मुंबईत पोलिसांनी पकडला आहे. त्याने एक, दोन नव्हे तब्बल सहा रिक्षांची चोरी केल्याचे समोर आले आहे. पण पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने चोरी करण्याचं जे कारण सांगितलं ते ऐकून पोलिसही अवाक् झाले. ते कारण समजल्यानंतर तुम्हीदेखील डोक्याला हात लावून म्हणाल अरे देवा…!
या कारणासाठी केली रिक्षांची चोरी
तुर्भे पोलीस ठाण्यात एक रिक्षा चोरीची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यासंदर्भात संबंधित पोलीस अधिकारी तपास करत असताना, खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गस्त घालत असताना त्यांनी शिळफाटा येथून एका इसमाला रिक्षासोबत ताब्यात घेतले. मुंब्रा येथील रहिवासी असलेला अश्रफ खान याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता, चोरीचं एक वेगळंच प्रकरण समोर आलं.
आपण रिक्षा चोरी केल्याची कबुली तर त्यान पोलिसांसमोर दिली. मात्र त्या रिक्षा चोरी करण्यामागचं जे कारण त्याने सांगितलं, ते ऐकून सर्व अधिकारी अवाक झाले. फिरायला जाण्यासाठी अश्रफ याने रिक्षा चोरल्या. त्याने पोलिसांच्या चौकशीत हे कबूल केले. बाहेर फिरायला जाताना इतर वाहनांमधून जाणं परवडायचं नाही, त्यामुळेच जवळपासच्या परिसरातील रिक्षा चोरून त्यातून फिरायला आवडायचं असं अश्रफने पोलिसांना सांगितले.
त्याने सांगितलेलं हे कारण ऐकल्यावर पोलीसही चक्रावून गेले. फक्त फिरण्यासाठी रिक्षाची चोरी करणाऱ्या आरोपीने आत्तापर्यंत एक, दोन नव्हे तर तब्बल ६ रिक्षांची चोरी केल्याचंही तपासातून निष्पन्न झालं.पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेल्या सर्व रिक्षा ताब्यात घेतल्या असून, अजून काही चोरीचे प्रकरण आहे का,या सदंर्भात तुर्भे पोलीस अधिक तपास करत आहेत.