मुंबई | 29 सप्टेंबर 2023 : राज्यातील वाढत्या गुन्ह्यांच्या घटनांमुळे (crime cases) नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहनचोरीची प्रकरणेही गेल्या काही महिन्यात प्रचंड वाढली असून गुन्हेगारांना वचक बसवा म्हणून पोलिसांनी तीव्र कारवाई सुरू केली आहे. याचदरम्यान नवी मुंबई पोलिसांनी तीन जणांना (arrested 3 accused) अटक करत वाहन चोरीच्या 14 गुन्ह्यांची यशस्वी उकल केल्याचा दावा केला आहे.
कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत टेम्पो चोरीच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी त्या भागात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची तपासणी करुन विश्लेषण केले. तर अन्य गुप्तचरांनी दिलेल्या खबरीमुळे पनवेल येथील अन्वर रसूलखान पठाण (वय 39) याला अटक करण्यात यश मिळाल्याचे पीटीआयच्या वृत्ता नमूद करण्यात आले आहे.
चौकशीतून धक्कादायक माहिती आली समोर
पोलिसांनी पठाणला ताब्यात घेतल्यानंतर खाक्या दाखवत कसून चौकशी सुरू केली. त्याच्या चौकशीतून अतिशय महत्वपूर्ण आणि गंभीर माहिती उघड झाली. त्यानुसार, पोलिसांनी कारवाई करत अखेर जालना जिल्ह्यातील मन्नान शेख (वय 36) आणि मूळचा बीड येथील असणारा मुल्ला उर्फ फिरोज शेख (वय 49) या आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली. नवी मुंबई पोलिसांच्या क्राईम युनिट दोनने शुक्रवारी या संदर्भातील माहिती एका रिपोर्टद्वारे जाहीर केली.
या तीन आरोपींच्या अटकेनंतर वाहन चोरीच्या सुमारे १४ गुन्ह्यांचा उलगडा केला आहे, असा दावा या रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केला. नवी मुंबई, ठाणे, अहमदनगर , परभणी, बीड, औरंगाबाद आणि जालना यासह विविध भागांमध्ये हे गुन्हे घडले होते, असेही पोलिसांनी सांगितले. मात्र त्यांची यशस्वी उकल झाली आहे. त्याचदरम्यान पोलिसांनी 10 एप टेम्पो, एक मोटारसायकल आणि एक टेम्पो इंजिनही जप्त केल्याची माहिती मिळाली आहे.
कॅब चालकावर हल्ला करून लूट
दरम्यान, दुसर्या एका घटनेत, मुंबईत आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे. सहा जणांनी कॅब चालकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. एवढेच नव्हे तर त्यांनी त्याच्या टॅक्सीसकट त्याचे वैयक्तिक सामाना आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला. बुधवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. पीडित कॅब चालकाने बदलापूर येथून ठाण्याला जाण्यासाठी एक भाडे स्वीकारले होते. प्रवास सुरू झाल्यानंतर उल्हास नदीजवळ एका निर्जन ठिकाणी पोहोचल्यानंतर टॅक्सीतील प्रवाशांनी कॅब ड्रायव्हर वर अचानक हल्ला केला. त्याला रस्त्यावर सोडून ते सर्व सामान घेऊन फरार झाले.
पीटीआयच्या वृत्तानुसार, आरोपींनी लुटलेल्या एकूण मालाची किंमत 8.11 लाख रुपये इतकी होते. टॅक्सी चालकाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर बदलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांतर्फे शोधमोहिम राबवण्यात येत आहे.