मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एकच खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पाणी भरण्यावरुन झालेल्या वादातून शेजाऱ्याने शेजाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे. फारुख शेख आणि आसिफ शेख अशी हल्ला करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी दोघांविरोधात धारावी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांना दोघा आरोपींना अटक केली आहे. मोहम्मद वाजिद शेख आणि मोहम्मद साजिद शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आरोपींची अधिक चौकशी करत आहेत.
धारावीमध्ये दररोज संध्याकाळच्या सुमारास पाणी येते. यावेळी पाणी भरण्यावरुन दोन शेजारणींमध्ये शनिवारी भांडण झाले. गव्हर्नर चाळच्या प्लॉट क्रमांक 21 मध्ये शनिवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास नसरीन बानो आणि तिची शेजारीण राबिया शेख भांडण झाले. भांडण इतके वाढले की, दोन्ही महिलांचे कुटुंबीयही भांडणात सामील झाले. यानंतर काही वेळाने भांडण मिटले.
भांडण जरी मिटले असले तरी मनातील राग मात्र शांत झाला नव्हता. याच भांडणातून एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबाचा काटा काढण्याचा कट रचला. एका कुटुंबातील मोहम्मद वाजिद शेख आणि मोहम्मद साजिद शेख यांनी दुसऱ्या कुटुंबातील फारुख शेख आणि त्याचा चुलत भाऊ आसिफ शेख यांच्यावर चाकू हल्ला करण्याचा कट रचला. त्यानुसार साजिदने फारुखच्या पोटात वार केला, तर वाजिदने आसिफच्या छातीत जीवघेणा वार केला. दोघांना अटक करण्यात आली आहे. भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.