पाटणा : जमिनीच्या वादातून शेजाऱ्याने शेजाऱ्याची सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारमधील पाटणा शहरात घडली. अर्जुन सिंग असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. पाटणा शहरातील आलमगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिस्कॉमन कॉलनीत 18 एप्रिल रोजी प्रॉपर्टी डीलर अर्जुन सिंगची हत्या झाली होती. या हत्येचा छडा लावण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. जमिनीच्या वादातून शेजारी विजय यादव याने अर्जुनसिंगची तीन लाखांची सुपारी देऊन शूटर्सच्या माध्यमातून हत्या केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी एक लोडेड पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे, एक मोटारसायकल आणि पाच मोबाईल याशिवाय घटनेत वापरलेली पॅशन प्रो मोटारसायकल जप्त केली आहे. अर्जुन सिंगच्या हत्येनंतर पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. पोलिसांनी तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीद्वारे प्रकरणाचा उलगडा केला.
प्रॉपर्टी डीलर अर्जुन सिंग याचा शेजारी विजय यादव याच्यासोबत अनेक दिवसांपासून जमिनीवरुन वाद सुरू होता. या वादातून विजय यादवने अर्जुन सिंगला तीन लाखांची सुपारी देऊन त्याची हत्या केली. विजय यादवने यापूर्वीही अर्जुन सिंगवर गोळीबार केल्याचा आरोप केला होता. अर्जुन सिंगला नालंदा जिल्ह्यातील रहिवासी शूटर सूरज कुमार आणि आगमकुआनमधील रहिवासी शूटर आशिक उर्फ छोटू यांनी गोळ्या घातल्या, तर तिसरा शूटर अभिनंदन कुमार संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून होता.
धनरुआचा रहिवासी बिट्टू कुमार आणि मसौरीचा रहिवासी नितीश कुमार यांनी आरोपींना हत्या करण्यात मदत केली होती. या हत्येचा सूत्रधार विजय यादव यालाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार विजय यादव याला पकडण्यासाठी पोलीस सर्वत्र छापेमारी करत आहेत.