भंडारा : भाजीवरुन झालेल्या क्षुल्लक वादातून भाच्यानेच मामाची फावड्याने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील कारधा येथील अजिमाबादमध्ये घडली आहे. याप्रकरणी कारधा पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारधा पोलिसांनी आरोपी भाच्याला अटक केली आहे. सुनील कुमार असे अटक करण्यात आलेल्या 18 वर्षीय आरोपी भाच्याचे नाव आहे. राजू गंगादयाल मनहारे असे हत्या झालेल्या 33 वर्षीय मामाचे नाव आहे. आरोपी आणि मयत दोघेही अजिमाबादमधील तन्नू पटेल यांच्या विटभट्टीवर मजुरीचे काम करतात.
मामा आणि भाच्यामध्ये रविवारी रात्री भाजीवरुन वाद झाला होता. यावेळी मयत मामा दारुच्या नशेत होता. या हाणामारीत मामा राजू मनहारे वीटभट्टीजवळ असलेल्या पाण्याच्या खड्यात पडला. मात्र दारु पिऊन असल्याने कुणीही लक्ष दिले नाही.
रात्रभर तो खड्डयातच पडून राहिला. सकाळी सर्वांनी जाऊन पाहिले असता, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची तात्काळ कारधा पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच कारधा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.
पोलिसांनी मृतेदह शवविच्छेदनासाठी भंडारा सामान्य रुग्णालयात पाठवत घटनेचा तपास सुरु केला. या प्रकरणी कारधा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करत आरोपी भाच्याला अटक केली आहे. पुढील तपास कारधा पोलीस करीत आहेत.
दोघेही मामा-भाचे मूळचे छत्तीसगड राज्यातील सालोनी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. छत्तीसगड राज्यातून शेकडो मजूर विटभट्टीच्या कामावर येतात. गावापासून लांब अंतरावर विटभट्टीवर राहतात.