नाशिक : प्राथमिक शिक्षक रमेश शिवराम भामरे यांचा अपघाती मृत्यू झाला म्हणून नाशिकच्या ग्रामीण पोलीसांच्या जायखेडा पोलीसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र, त्यानंतर ग्रामीण पोलिसांना आलेला संशय खरा ठरला असून भामरे यांचा मृत्यूबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. शिक्षक काकाला पुतण्यानेच संपवलेली घटना अनेकांना चक्रावून टाकणारी घटना असून रचलेली कथाच चर्चेचा विषय ठरत आहे. सटाणा तालुक्यातील पिंपळकोठे येथील रहिवासी रमेश भामरे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार दरम्यान जायखेडा पोलीस साध्या गणवेशात उपस्थित होते. पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती, त्यात काका आणि पुतण्या यांच्यामध्ये जमिनीवरुन वाद असल्याचे समजले होते. त्यावरूनच पोलिसांचा संशय बळावला होता. आणि पोलिसांचा हा संशय खरा ठरला. काका रमेश भामरे यांना पुतण्या सुजीत भामरे यांनी ट्रॅक्टरने धडक दिली होती. त्यानंतरचे फोन कॉलचा तपशील पोलीसांनी तपासाला असून त्यामध्ये धक्कादायक बाबी समोर आल्या आहे.
शनिवार प्राथमिक शिक्षक रमेश शिवराम भामरे यांना अज्ञात वाहनाने धडक दिली म्हणून अपघाती मृत्यू झाल्याची नोंद जायखेडा पोलिस ठाण्यात झाला होता.
मात्र, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय ग्रामीण पोलिसांना आला होता, पुतण्या सोबत मयत भामरे यांचा वाद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी याबाबत तांत्रिक मदत घेऊन गुन्ह्याची उकल केली असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मयत रमेश भामरे यांचा पुतण्या सुजीत सुनील भामरे यानेच भामरे यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने धडक दिली असून जखमी झालेल्या भामरे यांच्या डोक्यात वार करून त्यांना जीवे ठार मारले आहे.
भामरे यांच्या शरीरावर असलेल्या जखमा देखील संशयास्पद असल्याचे पोलिसांना लक्षात आल्याने भामरे यांच्या अंतिम संस्काराच्या वेळी स्थानिक गुन्हे शाखेचे सहा पोलिस साध्या गणवेशात नजर ठेऊन होते.
सुजीत भामरे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसीखाक्या दाखविल्यानंतर सुजित पोपटासारखा बोलू लागला आणि खून केल्याची कबुली दिली आहे.