आताचे युग हे डिजिटल (Digital) आहे. तुम्ही खिशात कुठलीही रोख रक्कम न ठेवताही केवळ डिजिटल माध्यमातून लाखोंची खरेदी करू शकतात. त्यासाठी तुमच्याकडे रोख रक्कम हवीच असे नाही. परंतु एखाद्या गोष्टींचे फायदे असतात, त्याच पध्दतीने तोटेही असतात. ज्या प्रमाणे डिजिटल व्यवहारांमुळे जीवन जगने सोपे झाले आहे, त्याच पद्धतीने ते अधिक किचकटही झाले आहे. सायबर हॅकिंगची रोज नवीन प्रकरणे समोर येत आहेत. हॅकर्स (Hackers) रोज नवीन युक्त्या शोधून सर्वसामान्यांना आपल्या फसवणुकीचा (Fraud) बळी बनवत आहेत. अलीकडे हॅकिंगची नवीन प्रकरणे समोर येत आहेत. अशावेळी ठग लिंक किंवा मेसेजद्वारे खाते रिकामे करत आहेत. अनेक उच्चशिक्षित नागरिकदेखील यास बळी पडतात. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची अधिक आवश्यकता निर्माण झाली आहे.
एनसीआरबीच्या ताज्या अहवालानुसार, भारतात ऑनलाइन बँकिंग फसवणुकीची 4047 प्रकरणे नोंदवली गेली. यातील बहुतांश प्रकरणे एटीएम फसवणुकीशी संबंधित आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर क्रेडिट आणि डेबिट कार्डची प्रकरणे होती. फसवणुकीच्या घटना नुकत्याच समोर आल्या आहेत, वीजबिल जमा करण्याच्या नावाखाली गुन्हेगार सामान्यांना मेसेज आणि एसएमएसद्वारे लिंक पाठवतात. या मेसेजमध्ये बिलाच्या माहितीसह एक लिंक आहे, त्यावर क्लिक करून पैसे जमा करण्यास सांगितले जाते.
चोरट्यांनी पाठविलेली लिंक प्रत्यक्षात वीज बिल वसुलीची नसते. हॅकर्स या लिंकद्वारे मोबाइल हॅक करतात. या लिंकवर क्लिक केल्यावर ग्राहकांच्या खात्यातून पैसे कापले जातात. काही कळायच्या आत ग्राहकांच्या खात्यातून लाखो रुपयांची रोकड लंपास केली जात असते.
हॅकर्स व्हॉट्सअॅप आणि एसएमएसद्वारे लिंक पाठवून ही फसवणूक करतात. यामुळे, यूजर्स लिंकद्वारे हॅकर्सच्या जाळ्यात अडकले जातात आणि आपली रक्कम गमावून बसतात. अनेकदा हॅकर्सच्या माध्यमातून पाठवलेल्या मेसेजमध्ये वीजबिल तत्काळ न भरल्यास वीज तोडण्यात येईल, अशी धमकी देण्यात येत असते. अशा वेळी सर्वसामान्य व्यक्ती घाबरून संबंधित लिंकवर क्लिक करतात आणि पैसे गमावून बसतात.