एनआयएने काल दिवसभर अमरावतीत छापेमारी केली. याप्रकरणी एनआयएच्या टीमने एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे. पाकिस्तानच्या एका संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. याप्रकरणी या तरुणाची काल रात्री कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर संशयित तरुणाला सोडून देण्यात आलं. पण आज सकाळी पुन्हा त्याची चौकशी सुरू केली आहे. कालपासून एनआयएची टीम अमरावतीत तळ ठोकून आहे. त्यामुळे अमरावतीकरांमध्ये उलटसुलट चर्चा रंगली आहे.
एनआयएच्या टीमने काल अमरावतीच्या छाया नगरात छापेमारी केली होती. यावेळी त्यांनी एका 22 वर्षीय तरुणाला संशयवारून ताब्यात घेतलं होतं. त्याला काल पहाटे 4 वाजता ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची दिवसभर कसून चौकशी करून रात्री उशिरा सोडून देण्यात आलं होतं. मोहम्मद शेख ईसा असं या संशयित तरुणाचं नाव आहे.
आजही चौकशी
या चौकशीनंतरही एनआयएचं पथक अमरावतीतून गेलं नाही. या पथकाने अमरावतीतच तळ ठोकला होता. आज पुन्हा सकाळपासून पथकाने या तरुणाची चौकशी सुरू केली. राजापेठ पोलीस ठाण्यात त्याच्या चौकशीला सुरुवात केली आहे. कालही या तरुणाची राजापेठ पोलीस ठाण्यात 15 तास चौकशी करण्यात आली होती. हा तरुण पाकिस्तानातील एका संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याची चौकशी सुरू आहे. आज त्याच्या चौकशीतून एनआयएच्या हाती काय लागतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजही त्याची चौकशी करून सोडून देण्यात येणार की त्याला अटक केली जाणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
माझा मुलगा निर्दोष
दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने महाराष्ट्रात काही ठिकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर तिघांना ताब्यात घेतलं होतं. छत्रपती संभाजीनगर, भिवंडी, अमरावती या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. तर अमरावतीत 35 वर्षीय मोहम्मद शेख ईसा याला संशयावरून ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली होती. ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांचा भारत विरोधी कारवाई करणाऱ्या जैश ए मोहम्मद या संघटनेशी संबंध असल्याचा आरोप आहे. या कारवाईनंतर मोहम्मदची आई मीडियासमोर आली होती. तिने माझा मुलगा निर्दोष आहे, त्याला सोडून द्यावं, अशी मागणी केली होती.
बीड बायपासवरून एकाला अटक
दरम्यान, बीड बायपासवरून एनआयएने एकाला अटक केली आहे. त्याच्यावरही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप आहे. हा तरुण मुंबईचा असल्याचं सांगितलं जात आहे. सातारा पोलिसांना सोबत घेऊन एनआयएने ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. या तरुणाची कसून चौकशी केल्यानंतरच सत्य बाहेर येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.