अमरावती : अमरावतीमध्ये (Amravati) 21 जूनला एका व्हेटर्नरी मेडिकल (Medical) व्यावसायिकाची गळा कापून निर्घृण हत्या करण्यात आली होती. उमेश कोल्हे असे या व्यवसायिकाचे नाव आहे. दरम्यान आता या हत्याप्रकरणाचा तपास एनआयएकडे (NIA) सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी एनआयएचे पथक अमरावतीमध्ये दाखल झाले आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) पथक अमरावती शहरात दाखल झाले असून, त्यांनी या प्रकरणाशी संबंधित चौकशी सुरू केली आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींची देखील यावेळी एनआयएच्या पथकाने चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. या हत्यामागे नुपूर शर्मा यांच्याशी संबंधित वाद असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसा आरोप देखील भाजपाच्या वतीने करण्यात आला आहे. कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती, त्यानंतर त्यांची हत्या झाली. त्यामुळे आता या प्रकरणाचा या हत्येशी काही संबंध आहे का याचा तपास देखील पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान याच प्रकरणाच्या चौकशीसाठी एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) पथक अमरावती शहरात दाखल झाले असून त्यांनी या प्रकरणाशी संबंधित चौकशी सुरू केलेली आहे. मात्र स्थानिक पोलिसांनी हे पथक शहरात आल्याबाबत दुजोरा दिला नाही. उमेश कोल्हे हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे एनआयए पथकाने पोलिसांकडून घटनेची सखोल माहिती घेतली असून, आरोपीची सुद्धा झाडाझडती घेतलेली आहे. त्यामुळे लवकरच कोल्हे हत्या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.