मुंबई : दिल्लीतील 25 वर्षीय व्यावसायिक नितीश कटारा (Nitish Katara) याची 17 फेब्रुवारी 2002 च्या पहाटे विकास यादव (Vikas Yadav) याने हत्या केली होती. विकास यादव हा उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे राजकारणी डी. पी. यादव यांचा मुलगा होता. कटाराने नुकतेच गाझियाबादमधील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीमधून पदवी प्राप्त केली होती. तिथे तो त्याची वर्गमैत्रीण भारती यादव, म्हणजेच आरोपी विकास यादवच्या बहिणीच्या प्रेमात पडला होता. यादव कुटुंबाला दोघांचे नाते मान्य नसल्यामुळेच विकास यादवने नितीश कटाराची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता.
यादव कुटुंबाने भारती आणि नितीश या दोघांच्या नात्याला कधीही मान्यता दिली नव्हती. नितीशला अनेक वेळा भारतीपासून दूर राहण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. 16 फेब्रुवारी 2002 च्या रात्री, भारती आणि नितीश एका मित्राच्या लग्नाला गेले होते, तिथे भारतीचा भाऊ विकास आणि चुलत भाऊ विशाल यादवही उपस्थित होते. विकास आणि विशाल यांनी नितीशला तिथून गाडीने बाहेर नेले, मात्र ते परत आलेच नाहीत. तीन दिवसांनंतर नितीश कटाराचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत महामार्गालगत सापडला होता; त्याच्यावर हातोडीने वार करण्यात आले होते, तसेच डिझेल ओतून त्याचा मृतदेह पेटवण्यात आला होता.
2002 पर्यंत नितीश कटारा आणि भारती यादव यांच्या अफेअरची चर्चा होती. ते जवळपास चार वर्ष डेटिंग करत होते. मात्र 2006 मध्ये न्यायालयीन साक्षीत भारती यादवने आपल्या दोघांमध्ये मैत्रीच्या पलीकडे कोणतेही नाते नसल्याचे सांगितले होते.
नेमकं काय घडलं?
16 फेब्रुवारी 2002 रोजी भारती यादव आणि नितीश कटारा गाझियाबादमध्ये एका मित्राच्या लग्नात सहभागी झाले होते. भारतीची आई, तिचा भाऊ विकास आणि बहीण मिताली असे सगळे तिथे होते. लग्न सोहळा झाल्यानंतर विकास यादव आणि त्याचा चुलत भाऊ विशाल यादव यांनी नितीश कटाराला त्यांच्या टाटा सफारी एसयूव्हीमध्ये नेताना पाहिल्याचे किमान चार जणांनी कोर्टाला सांगितले होते. नितीश लगेचच परत येईल, असं त्याच्या मित्रांना वाटत होतं, मात्र मध्यरात्रीपर्यंत तो परत आला नाही. अखेर नितीशसोबत टॅक्सीने लग्नाला आलेले भरत दिवाकरही वाट पाहून त्यांच्या घरी निघून गेले.
नीलम कटारा-भारती यांची रात्रभर शोधाशोध
पहाटे 3 वाजता नितीशची आई नीलम कटारा यांनी भारतीला फोन केला. मात्र भारती स्वतः नितीशचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांना समजलं. भारतीने नीलमला कटारा यांना पोलिसांकडे जाण्यास सांगितले, आणि असेही सांगितले की कदाचित आपले भाऊ – विकास आणि विशाल हे नितीशला पंजाबला घेऊन गेले असतील. भारतीने तिची बहीण भावना यादव हिलाही फोन केला होता, तिचा नोंदणीकृत मोबाईल फोन नंबर नितीश-भारती यांच्या अनेक मित्रांना तसेच नीलम कटारा यांना रात्रभर कॉल करण्यासाठी वापरला गेला होता. भारतीने नीलम कटारांना आपल्या वडिलांचा नंबरही दिला. पोलिसांना दिलेली भेट निष्फळ ठरल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता नीलमने भारतीचे वडील डीपी यादव यांना फोन केला, मात्र त्यांनाही विकास-विशाल किंवा नितीश कुठे असतील, हे माहित नव्हते.
नितीशचा मृतदेह सापडला
दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना लग्नाच्या ठिकाणापासून 80 किलोमीटर अंतरावर खुर्जा येथे जळालेल्या अवस्थेतील एक मृतदेह सापडला होता. त्याला इतक्या वाईट पद्धतीने मारहाण करण्यात आली होती, की त्याची पचनसंस्था शरीराबाहेर पडली होती. सकाळी 11 वाजता नीलम कटारा यांनी एफआयआर दाखल केला. त्यांच्या आणि भारती यादवच्या जबाबांच्या आधारे, विकास आणि विशालविरोधात वॉरंट जारी करण्यात आले.
नितीश कटाराच्या हत्येप्रकरणी विकास आणि विशाल यादव यांना ट्रायल कोर्टाने दोषी ठरवले आणि दोघांना 30 मे 2008 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 2 एप्रिल 2014 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या जन्मठेपेच्या शिक्षाचे समर्थन केले. 6 फेब्रुवारी 2015 रोजी, दिल्ली उच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेच्या पुनर्मागणीवर सुनावणी करताना दोघांची शिक्षा वाढवून 25 वर्षांची कठोर जन्मठेप केली. विशाल आणि विकास यादव यांना फाशीची शिक्षा देण्याची नितीशची आई नीलम कटारा यांची मागणी करणारी याचिका 9 सप्टेंबर 2015 रोजी, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. 3 ऑक्टोबर 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयाने विकास आणि विशाल यादव, तसेच सुखदेव पेहेलवान (तिसरा आरोपी) यांना कुठल्याही माफीशिवाय 25 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
संबंधित बातम्या :
आमदार पित्यासह कुटुंबातील आठ जणांची हत्या, 2001 मधील गाजलेलं पुनिया हत्याकांड काय आहे?