मुंबई : महाराष्ट्र आणि शेजारील राज्यात चेन स्नॅचिंग, चोरी आणि चिटींगच्या शंभरहून अधिक केसेस नावावर असलेल्या तसेच पाच प्रोडक्शन वॉरंट आणि चार अजामिनपात्र वॉरंट शिवाय मोक्का कायद्यांतर्गत कारवाई होऊनही पोलिसांना गुंगारा देणाऱ्या इराणी टोळीचा कुख्यात गुंड कासिम मुखतार इराणी उर्फ तल्लफ याला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या मदतीने धारवाड परिसरातून अटक केली आहे. आरोपीकडून एक देशी पिस्तुल, 5 मोटर सायकल असा आठ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सराईत गुंड कासिम इराणी हा आंबीवली परिसरातील इराणी वस्तीसह मुंब्रा आणि घाटकोपर अशा इराणी वस्तीत आपला मुक्काम सतत बदलत राहायचा. त्याला पकडण्याचा अनेकदा प्रयत्न केला मात्र तो आपली राहण्याची ठिकाणे वारंवार बदलत असल्याने त्याला पकडण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते.
हा आरोपी कर्नाटकमधील धारवाड परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसानी स्थानिक पोलिसांच्या मदतीने तो राहत असलेल्या परिसरात पहाटेच्या सुमारास सापळा रचला. पोलीस आल्याची माहिती मिळताच कासिमने घराची कौले काढून बाजूच्या इमारतीच्या टेरेसवरुन फिल्मीस्टाइलने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी चातुर्याने त्याला अटक केली. त्याच्या झडती घेतली असता त्याच्या कडून एक देशी पिस्तुल जप्त केली आहे.
आरोपीला कल्याण झोन – 3 चे पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण घेटे, खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी अनिल गायकवाड, मधुकर दाभाडे, अशोक पवार, जितेंद्र ठोके, संजय चव्हाण, संदिप भोईर यांनी कर्नाटक पोलिसांच्या मदतीने बेड्या ठोकल्या. खडकपाडा पोलीसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.