चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक : बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेल्या वृद्ध व्यक्तीच्या अंगावरुन बैलगाडा गेल्याची घटना नाशिकमध्ये घडली. या घटनेत वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाले होते. जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. श्रावण जगन्नाथ सोनवणे असे या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बैलगाडा शर्यतीत ही दुर्दैवी घटना घडल्याने शर्यतीच्या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. सोनावणे यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
गेल्या आठवड्यात 6 जून रोजी नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील बोरगड येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैलगाडा शर्यत बघण्यासाठी आलेल्या एका 64 वर्षीय वृद्धाच्या अंगावरून बैलगाडा गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते. या वृद्ध व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. श्रावण सोनवणे हे बैलगाडा शर्यत बघण्यासाठी आले होते. यावेळी बैलगाडा शर्यतीतील बैल उधळल्याने सोनवणे यांच्या अंगावरून बैलगाडी गेली होती. त्यात त्यांच्या छातीला गंभीर मार लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच सोनवणे यांचा मृत्यू झाला.