नाशिक : सध्या व्हॅलेंटाईन वीक ( Velntine Week )सुरू आहे. याच काळात तरुणाईत विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ( College Student ) मोठा उत्साह असतो. प्रेम व्यक्त करण्याचा सुरू असलेल्या या प्रेमाच्या सप्ताहात नाशिक पोलीसांनी ( Nashik Police ) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईने महाविद्यालयीन वर्तुळासह संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. तरुणाईमध्ये सध्या पोलीसांच्या याच कारवाईची जोरदार चर्चा आहे. पोलीसांच्या कारवाईनंतर नाशिक शहरातील तरुणाईमध्ये कसली क्रेझ आहे हे देखील समोर आले आहे.
नाशिक शहरातील गुन्हे शाखेच्या पथकाने केलेली कारवाईची चर्चा होत असतांना ई सिगारेटची सुद्धा चर्चा होऊ लागली आहे. नाशिक शहर पोलीसांनी कारवाई 88 हजार रुपयांचे ई सिगारेट जप्त केले आहे.
नाशिक पोलीस दलाच्या गुन्हे शाखेच्या पथकाला कॉलेजरोड परिसरात ई सिगारेटची मोठी चर्चा आहे अशी माहिती मिळाली होती. त्यामध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने यामध्ये सापळा रचत ही कारवाई केली आहे.
शहरातील तरुणाईमध्ये आणि महाविद्यायच्या विद्यार्थ्यांमध्ये ई-सिगारेट ओढण्याचा प्रकार सर्रास सुरू होता. तरुण-तरुणी अमली पदार्थाच्या विळख्यात सापडत असल्याचे समोर आल्यानंतर पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे.
कॉलेजरोड परीसारत ई सिगारेट विक्री करणारे सर्वेश रामधनी पाल, फैसल अब्दुल शेख यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 9 निकोटिन युक्त ई सिगारेटच्या बॉक्स, 80 नग ई सिगारेट असा एकूण 88 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
महाविद्यालयातील तरुण-तरुणी यांचा ई सिगारेट वापरण्याचे प्रमाण यावरून समोर येत आहे. कॉलेजरोड परिसरात असलेला तरुणाईचा वावर बघून ई सिगारेटची मोठी विक्री सुरू असल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे.
नाशिक शहर पोलीसांनी या कारवाईवरच न थांबता याच्या मुळाशी जाऊन कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या काळात पुनः ई सिगारेटचा सुळसुळाट बघायला मिळेल. कॉलेजरोड परिसरात याबाबत तपासणी मोहीम राबविणे देखील गरजेचे आहे.
असं असतं ई सिगारेट –
बाजारात मिळणाऱ्या सिगारेट पेक्षा ई सिगारेट काही वेगळे नाहीत. साध्या सिगारेटमध्ये तंबाखू सारखे पदार्थ असल्याने त्याचा धूर होतो. मात्र, ई सिगारेट मध्ये तंबाखू किंवा तसा पदार्थ नसतो. त्यामध्ये द्रव असते. त्याला लाईटर किंवा काडीपेटीची गरज नसते. त्यामध्ये बॅटरी असते, ज्यावेळी सिगारेट ओढली जाते त्यावेळी आपोआप पेट घेत असते. साध्या सिगारेट पेक्षा ई सिगारेटचा आकार मोठा असतो.