उस्मानाबाद : वडिलांनी मुलीची हत्या (daughter killed by father) केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय. उस्मानाबादच्या तुळजापूर (Tulajapur, Osmanabad) तालुक्यातील कार्ला इथं ही धक्कादायक घटना घडली. 20 वर्षीय विवाहित मुलीची वडिलांनीच गोळी झाडून हत्या केली. या हत्येचं कारण उघडकीस आल्यानंतर सगळेच हादरुन गेलेत. कुत्र्याने मटण खाल्लं म्हणून वडिलांनी मुलीचा जीव घेतला. या हत्येआधी थरारक घटना घडल्याचंही समोर आलंय. याप्रकरणी उस्मानाबादच्या नळदुर्ग पोलिसांनी (Naladurg Police) मयत तरुणीच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.
काजल शिंदे ही आपल्या आईवडिलांच्या घरी पतीसोबत राहत होती. रविवारी माहेरच्या घरी मटण आणण्यात आलं होतं. ग्रेव्ही बनवून ती इतर काम करु लागली. त्यादरम्यान कुत्र्याने मटण खाल्ल्याचा प्रकार काजलची आई मीरा यांनी पाहिलं. हे पाहताक्षणी त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली.
यावेळी काजल आणि तिची आई मीरा यांच्यामध्ये जोरदार भांडण झालं. काजलनेही आईला उलट उत्तर देण्यास सुरुवात केली. काजलचे वडील दारुच्या नशेत होते. मुलगी आईसोबत भांडतेय, पाहून ते संपातले. त्यांनी संतापाच्या भरात खुंटीवर टांगलेली गावठी बंदूक काढली आणि त्यातून काजलवर थेट गोळीच झाडली. काजलची हत्या करणाऱ्या तिच्या वडिलांचं नाव गणेश झंप्या भोसले असं आहे. रविवारी संध्याकाळी पाच वाजता ही धक्कादायक घटना घडली.
वडिलांनी मारलेली गोळी काजलच्या छातीत घुसली. गंभीररीत्या जखमी झालेली काजल रक्ताच्या थारोळ्यात पडली. ही घटना घडल्याचं कळल्यानंतर काजल्या नातेवाईकांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला. पण जिल्हा रुग्णालयात नेत असतानाच काजलची मृत्यूशी सुरु असलेल्यी झुंज अपयशी ठरली आणि तिचा मृत्यू झाला.
यानंतर मृत्यू झालेल्या काजलच्या पतीने पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दिली. पती मनोज सुनील शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी काजलच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल करुन घेतला. सध्या या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी गणेश भोसले फरार आहेत. तर पोलिसांनी काजलची आई मीरा भोसले यांना अटक केली आहे. मुख्य आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांकडून पथकही रवाना करण्यात आलंय. नळदुर्ग पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.