नवी दिल्ली | 27 फेब्रुवारी 2024 : राजस्थानच्या इंटेलिजन्स ब्युरोने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय एजंट विक्रम सिंग (31) याला बिकानेर येथून अटक केली आहे. विक्रम सिंग हा हनी ट्रॅपमध्ये अडकला होता. पाकिस्तानात बसलेल्या त्याच्या हँडलर अनिता हिला भारताची गुप्त माहिती पाठवत होता. राजस्थान इंटेलिजन्स ब्युरो आणि मिलिटरी इंटेलिजन्सने विक्रम याला बेड्या ठोकल्या आहेत. तपास यंत्रणा बराच काळ त्याचा फोन ट्रॅप करत होत्या. तपासादरम्यान तो एका पाकिस्तानी महिलेशी बोलत असल्याचे समोर आले.
राजस्थान इंटेलिजन्स ब्युरोच्या माहितीनुसार आरोपी विक्रम सिंग हा बिकानेरमधील आर्मी एरियामध्ये कॅन्टीन चालवतो. या कॅन्टीनमध्ये लष्कराचे अधिकारी येत असत. यातूनच त्याची अनेक अधिकाऱ्यांशी ओळख झाली होती. त्यांच्याकडून मिळालेली माहिती तो पाकिस्तानात बसलेल्या आपल्या महिला हँडलरला पाठवत असे. अनिता असे त्या महिला हँडलरचे नाव आहे. विक्रम सिंग हा लाखसरच्या बास गावचा रहिवासी आहे.
पाकिस्तानी महिला अनिता ही पाकिस्तानात बसून भारतीय मोबाईल नंबरवरून विक्रमशी बोलत होती. तिने विक्रम याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्याच्याकडून लष्कराचे क्षेत्र आणि लष्करातील अधिकाऱ्यांची गुप्त माहिती घेत होती. पोलिस विक्रम याची कसून चौकशी करत आहेत. त्याने अनिता हिला काय माहिती दिली याचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी विक्रम याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा मोबाईल जप्त केला आहे. याआधी 2023 मध्ये पाकिस्तानी एजंट नरेंद्र कुमार यालाही राजस्थानच्या बिकानेर येथून पकडण्यात आले होते. पाकिस्तानची एक टोळी भारताची गुप्त माहिती गोळा करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचा वापर करत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
गेल्या काही महिन्यांत विक्रम याच्यासोबत मोबाईलवर किती जणांनी संपर्क केला. तो कोणाशी काय बोलला या सर्व गोष्टींचा शोध पोलीस घेत आहेत. याशिवाय त्याच्या बँक खात्यांचाही शोध सुरू आहे. तो कोणत्या तरी महिलेच्या प्रेमात पडला होता की गुप्तचर माहिती लिक करण्यासाठी त्याला पैसे मिळत होते? या दृष्टीने पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.