मुंबई | 13 सप्टेंबर 2023 : एका २८ वर्षीय मेकअप आर्टिस्टच्या हत्येचा उलगडा झाल्यामुळे संपूर्ण मुंबई हादरली. त्या तरूणीच्या (नयना) लिव्ह-इन पार्टनरनेच (live in partner murder) तिचा जीव घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे मीरा-रोड येथील लिव्ह-इन पार्टनरच्या हत्याकांडाच्या (crime news) आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. त्या केसप्रमाणेच पालघरमध्येही आरोपी मनोहर शुक्लाने अत्यंत थंड डोक्याने ही हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची माहिती समोर येत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, या नृशंस कृत्यात त्याच्या पत्नीनेही त्याची साथ दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून दोघांनाही या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच नयना हिने तिच्या बहिणीकडे आपल्या जीवाचं काही बरवाईट होऊ शकतं, अशी भीती व्यक्त केली होती. मनोहर (आरोपी) तिला जिवानिशी मारू शकतो, अशी भीती तिने बहिणीसमोर बोलताना व्यक्त केली होती. दुर्दैवाने तेच खरं ठरलं.
आरोपी मनोहर हा देखील नयनाप्रमाणेच फिल्म इंडस्ट्रीमध्ये कामाला होता. तो विवाहीत असून त्याला एक लहान मुलगी देखील आहे. नयना हिने काही वर्षांपूर्वी त्याच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. ती मागे घ्यावी यासाठी आरोपी नयनावर दबाव आणत होता, मात्र तिने नकार दिल्यानेच आरोपीने (हत्येचे) हे नृशंस कृत्य केले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कधी केला खून ?
9 ते 12 ऑगस्टदरम्यान ही हत्या झाली असावी अशी माहिती समोर येत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या हत्येमध्ये आरोपीच्या पत्नीनेही त्याची साथ दिली असून नंतर पीडितेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासही तिने मदत केली, अशी माहिती समोर येत आहे. दोघांनाही पोलिसांनी मंगळवारी अटक केली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. मंगळवारी त्या दोघांना स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्यांना १६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
गुजरातमधील वलसाड येथे एका खाडीत सुटकेसमध्ये पॅक केलेल्या अवस्थेत पीडितेचा मृतदेह सापडला होता. वलसाडमधील पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती व मृतदेहासंदर्भात दावा करण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले, असेही पोलिसांनी सांगितले. नयना हिला पाण्यात बुडवून मारण्यात आले व त्यानंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये पॅक करून गुजरातमध्ये नेऊन खाडीत टाकण्यात आला असावा, अशी माहिती प्राथमिकतपासातून समोर आली आहे.
बहिणीकडे व्यक्त केली होती भीती
पीडित महिला नयना हिची बहीण जया, तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होती. पण तिचा फोन बंद होता. नातेवाईक आणि ओळखीच्यांकडेही चौकशी केली. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. नयनाशी संपर्क होऊ शकला नाही. अखेर तिने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता हा गुन्हा उघडकीस आला.
एफआयआरनुसार, नयना हिने एकदा तिच्या बहिणीकडे भीती व्यक्त केली होती. मनोहर (आरोपी) तिला मारून टाकेल, अशी भीती तिला वाटत होती, असे तिच्या बहिणीने नमूद केले. तिच्या बहिणीच्या सांगण्यानुसार, ती जुलै महिन्यात नयना हिच्यासोबत तिच्या नायगाव येथील घरात महिनाभर राहिली होती. 2019 साली मध्ये आरोपीने नयनावर हल्ला केला होता. त्यासंदर्भारात विरार पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.
नयना हिने २०१९ मध्ये आरोपीविरुद्ध बलात्काराची तक्रारही दाखल केली होती.तीच तक्रार मागे घेण्यासाठी आरोपीने तिच्यावर दबाव टाकण्यास सुरूवात केली होती. मात्र ती त्याचे काहीच ऐकत नव्हती.त्याने तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. यामुळेच तो आपल्याला मारून टाकेल, अशी भीती नयना हिला वाटत होती, असे तिच्या बहिणीने सांगितले. तसेच आरोपीने नयनाला, तिच्या बहिणीसमोरही जीवे मारण्याची धमकी दिली होती.