नाशिक : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांमध्ये कोयता (Koyata Gang) हातात घेऊन दहशत निर्माण करण्याची क्रेझ आली आहे. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोयते घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न ( Crime News ) केल्याचे समोर आले आहे. तेच कोयता गॅंगचे लोण नाशिक शहरातही ( Nashik News ) पसरले आहे. शहरातील गुन्हेगारीच्या घटना पहिल्यातर कोयत्याचा सर्रासपने वापर होत आहे. त्यामुळे कोयता घेऊन गुन्हेगारी करणारी टोळी शहरात पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. अशातच पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाशिक पोलीसांच्या दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे.
नाशिकच्या पंचवटी परिसरात दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने केलेल्या कारवाईची संपूर्ण शहरात चर्चा होऊ लागली आहे. पोलीसांनी केलेल्या कामाचे नाशिककरांकडून कौतुक केले जात आहे.
हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून कोयते आणि चॉपर अशी शस्रे ताब्यात घेतली आहे. त्यामध्ये चार कोयते आणि एक चॉपर असा समावेश आहे.
अंकुश मोतीराम जाधव आणि श्रीकांत सुरेश मुकणे यांना दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघेही पंचवटीतील शेरे मळा परीसरातील आहे. लूट किंवा हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र त्यापूर्वीच नाशिक पोलीसांनी त्यांचा डाव उधळून लावला आहे.
अटक केलेल्या दोघांकडून गणेशवाडी परिसरात हल्ला किंवा लूट करण्याची आखणी सुरू होती. त्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीसांनी आधीच सापळा लावून ठेवला होता.
दोघे ज्या परिसरात येणार तिथे पोलीस दबा धरून बसलेले होते. त्यानुसार पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडील शस्र ताब्यात घेतली, त्याच वेळी त्यांनी पोलिसांशी झटापट केली.
मात्र, पोलिसांचा सापळा यशस्वी झाला आणि दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांचा अधिकचा तपास सुरू झाला आहे. पोलीसांनी केलेल्या या कारवाईमुळे कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्याचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
पंचवटीत केलेल्या कारवाईत पोलीस अधिकारी किरण रोंदळ, प्रेमचंद गांगुर्डे, विजयकुमार सूर्यवंशी, भाऊसाहेब क्षीरसागर, शेख कादीर, श्रीशैल सवळी, कडुबा पाटील, संदीप डावरे, प्रफुल्ल गांगुर्डे, प्रवीण चव्हाण, विशाल जोशी, महेश खांडबहाले, मनिषा मल्लाह यांचा सहभाग होता.
नाशिक शहरात दोनच दिवसांपूर्वी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बहिणीची छेड काढल्यानंतर जाब विचारायला गेलेल्या भावसाहित बहीणीवर कोयत्याने वार करत हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यामुळे शहर पोलीस दलातील पोलीसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली जात होती.