सोलापूर : पंढरपूर जवळच्या कळंब इथं ट्रॅक्टरचा मोठा अपघात झाला. उजनी कालव्यात ट्रॅक्टर कोसळून पाच जण ठार झालेत. यात 3 महिलांचा समावेश असून दोन लहान मुलांवरही काळानं घाला घातलाय. ऊस तोड मजूर ऊसाच्या फडात जात असताना ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. मध्य प्रदेशातील ऊस तोड कामगारांच्या ट्रॅक्टरचा हा अपघात भरधाव वेगामुळे झाला असल्याचं सांगितलं जातंय.
या भीषण अपघातामध्ये जखमी झालेल्या मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्ट ट्रॅक्टरमधील सर्व ऊस तोड मजूर हे मध्य प्रदेशातून आले होते. कामानिमित्त जात असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला. मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
रात्री ऊस तोड कामगारांना घेऊन हा ट्रॅक्टर उसाच्या फडात जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान, यावेळी ट्रॅक्टरचा वेग चालकाला नियंत्रित करता आला नाही आणि हा ट्रॅक्टर करकंब परिसरात उजनी कालव्यात पडला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धावत घेतली आणि बचावकार्य केलं.
पोलिसांनी अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, 5 जणांच्या मृत्यूने ऊस तोड कामगारांच्या या समूहावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लहान मुलं आणि महिलांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जातेय.
या अपघातातील मृतांची नावं कळू शकलेली नाही. सध्या त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. या अपघातात ट्रॅक्टर ट्रॉलीचंही मोठं नुकसान झालं.