31 डिसेंबरला पार्टी, पण 1 जानेवारीला मृत्यू..पोलिसाच्या हत्येच गूढ उलगडलं, घरातल्या जवळच्या व्यक्तीनेच काढला काटा, पण का ?

| Updated on: Jan 09, 2025 | 2:48 PM

पनवेल जीआरपीमध्ये कार्यरत असणाऱ्या विजय रमेश चव्हाण यांच्या मृत्यूने अख्खं पोलीस दल हादरलं होतं. मात्र अखेर या हत्येचं गूढ आता उलगडलं असून पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या पोलिसाच्या घरातील व्यक्तीचाच या हत्येत सहभाग असल्याचे उघड झाले

31 डिसेंबरला पार्टी, पण 1 जानेवारीला मृत्यू..पोलिसाच्या हत्येच गूढ उलगडलं, घरातल्या जवळच्या व्यक्तीनेच काढला काटा, पण का ?
पोलिसाच्या हत्येच गूढ उलगडलं, घरातल्या जवळच्या व्यक्तीनेच काढला काटा, पण का ?
Follow us on

नववर्षाच्या सुरूवातीलाच मुंबईतील घणसोली आणि रबाळे रेल्वे स्थानकादरम्यान एका पोलिसाचा मृतदेह सापडला होता. पनवेल जीआरपीमध्ये कार्यरत असणाऱ्या विजय रमेश चव्हाण यांच्या मृत्यूने अख्खं पोलीस दल हादरलं होतं. मात्र अखेर या हत्येचं गूढ आता उलगडलं असून पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या पोलिसाच्या घरातील व्यक्तीचाच या हत्येत सहभाग असल्याचे उघड झाले असून पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

विजय चव्हाण यांच्या हत्येच्या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी या गुन्ह्यात पोलिसांनी विजय चव्हाण यांची पत्नी, तिचा प्रियकर आणि आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. चव्हाण यांची पत्नी पूजा चव्हाण (वय 35) आणि तिचा प्रियकर निंबा ब्राह्मणे (वय 29) यांनी कट रचून विजय चव्हाण यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. वाशी रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी ब्राह्मणे, पूजा चव्हाण, प्रकाश उर्फ धीरज गुलाब चव्हाण (वय 23) आणि प्रवीण आबा पानपाटील (वय 21) अशा चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.

31 डिसेंबरला पार्टी पण 1 जानेवारीला खून

विजय चव्हाण यांची हत्या झाल्याचे समजल्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी स्वतःहून याबद्दल गुन्हा दाखल केला. तसेच रेल्वे पोलीस उपायुक्त रवींद्र शिसवे यांच्या निरीक्षणाखाली तपास सुरू केला. यासाठी अनेक टीम तयार करण्यात आल्या. पाच दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी खरे मारेकरी शोधले. चव्हाण यांच्या पत्नीचा प्रियकर ब्राह्मणेने रचलेल्या कटानुसार, प्रवीणपानपाटीलने चव्हाण यांना नवीन वर्षाच्या पार्टीसाठी 31 डिसेंबर रोजी बोलावून घेतले. चव्हाण आल्यानंतर त्या दोघांनी प्रकाश उर्फ धीरजच्या इको वाहनात एकत्र बसून पार्टी केली. विजय चव्हाण मद्याच्या अमलाखाली गेल्यानंतर ब्राह्मणे तिथे आला आणि रात्री 11.30 च्या सुमारास त्याने गळा दाबून चव्हाणची त्या केली.

मोटरमनला दिसलं ते कृत्य आणि..

यानंतर त्या तिघांनी चव्हाण यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅक नजीक नेऊन टाकला. या घटनेनंतर धीरज मात्र भेदरला होता. त्यामुळे ब्राह्मणेने त्याला इको वाहन घरी नेण्यास सांगितले. धीरज आपली गाडी घेऊन घरी गेला. यादरम्यान ब्राह्मणे आणि पानपाटील रेल्वे ट्रॅकशेजारीच तब्बल चार तास थांबले. सकाळी जेव्हा पहिली ट्रेन यायला लागली, तेव्हा त्यांनी चव्हाणचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर ठेवला. लोकल अत्यंत जवळ आल्यानंतर मारेकर्‍यांनी केलेले हे कृत्य मोटरमनच्या निदर्शनास आले. मोटरमनने या घटनेची माहिती आरपीएफ जवान आणि वाशी रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चव्हाण यांचा मृतदेह ताब्यात घेतला.

जीपेच्या शेवटच्या व्यवहारावरून लागला सुगावा

तपास सुरू केल्यानंतर पोलिसांनी चव्हाण यांचा मोबाइल कसून तपासला. तेव्हा मोबाइलमधील जीपेवरून शेवटचा व्यवहार घनसोली येथे एका अंडा स्टॉलवर करण्यात आल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना हा पहिला पुरावा मिळाला. या स्टॉलच्या नजीक असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर पोलिसांना विजय चव्हाण आणि त्यांच्याबरोबर असलेला धीरज आढळून आला. तसेच चव्हाण यांनी शेवटचा व्हिडीओ कॉल आपल्या मित्राला केला होता, त्यातही धीरज त्यांच्या बरोबर असल्याचे आढळून आले. त्यावरूनच माग काढत पोलसांनी तपास सुरू केला आणि अखेर खुनाचा उलगडा झाला. आणि पोलिसांनी मृत चव्हाण यांची पत्नी, तिचा प्रियकर यांच्यासह आणखी दोांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली.