अवैध वाळूउपसा (संग्रहित छायाचित्र)
Image Credit source: tv9
परभणी : राज्य सरकारने यंदा सामान्यांना वाजवी दरात वाळू (Sand Business) भेटावी यासाठी वाळू वितरणाचे नियम प्रचंड शिथिल केले. अपेक्षा होती यामुळे सामान्यांना यंदा वाजवी दरात वाळू मिळेल. मात्र असं न होता वाळू घाटांचे लिलाव चढ्या दराने झाले. त्यामुळे सामान्यांना परत वाळू खरेदीसाठी (Sand Sale) तारेवरची कसरतच करावी लागली. परभणी (Parbhani Crime News) जिल्ह्यात यंदा वाळूचा सीजन पूर्ण वादात सापडला. वाळू घाटांवर पोलिसांच्या कारवाईने जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला. तर दुसरीकडे महसूल विभाग मात्र पूर्ण सीजन मूग गिळून शांतच राहिला. एकीकडे पोलिसांच्या कोट्यावधी रुपयांच्या कारवाया, तर दुसरीकडं महसूल मात्र साखर झोपेत, असे एकूणच चित्र या वर्षी पाहायला मिळाला. लिलाव झालेल्या वाळू घाटांवर सर्व नियम धाब्यावर बसवत बेसुमारपणे उपसा केला जात असल्याचा ही आरोप झाला . जिल्हा पोलिस प्रशासनाकडून मात्र एका महिन्यात 264 जणांवर गुन्हे दाखल करून 33 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .
अवैध वाळू उपस्याचा वादातून एकाचा खून….
जिल्ह्यातील पालम तालुक्यातील रावराजूर येथे 24 मार्च रोजी अवैध वाळू उपसा रोखणाच्या वादातून माधव त्र्यंबक शिंदे या युवकाचा वाळू माफियांकडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटनाही घडली. गंगाखेड ठाण्यात आठ जणांविरोधात 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वेगवेगळ्या कारवायांमध्ये अवैध वाळूप्रकरणातून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त करण्यात आलाय.
कशा झाल्या पोलीस कारवाया?
- परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील मोहळा येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांनी पथकासह 10 मेच्या पहाटे 5.30 वा. गोदावरी नदीच्या पात्र धाड टाकली. यावेळी पाण्यातील रेती बोटीने काढून काढलेली रेती पोकलँडच्या सहाय्याने हायवमध्ये चोरून भरून विक्री व साठा करण्याकरीता घेवून जात असताना पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत 2 बोटी , 4 पोकलँड व 12 हायवा ट्रक व दोन हायवा ट्रक भरून रेती, असे मिळून 94 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी 35 आरोपींविरोधात सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
- गंगाखेड पोलिसांच्या पथकाने वझूर तालुक्यातील पुर्णा शिवारात धाड टाकली. या कारवाईत टिप्पर, हायवा, इतर वाहनांसह अवैध रेतीचा साठा असा एकूण 7 कोटी 30 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात 98 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला .
- पाथरी तालुक्यात असलेल्या डाकुपिंप्री शिवारातील वाळू धक्क्यावर पोलिसांची धाड टाकत 13 आरोपींवर गुन्हा दाखल करत 3 पोकलँड, 1 हायवा असा एकूण 1 कोटी 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
- जिल्ह्यातील पालम तालुक्यातील फळा येथे 24 तारखेला दुपारी 12.30 वा. जिल्हास्तरीय दक्षता पथकास अवैध गौण खनिज उत्खनन करताना एकूण 7 हायवा, 3 बोट, 1 जेसीबी आढळून आले. ही वाहने जप्त करण्यात आली .
- परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत 26 मे रोजी राहटी येथे छापा टाकत 1 पोकलॅन, 1 टिप्पर आणि रेती असा 70 लाख 1 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
- पोलिस महसूलच्या पथकाकडून अवैध वाळू उपशावर 28 तारखेला पाथरी तालुक्यातील मंजरथ येथील वाळू धक्क्यावर महसूल व पोलिसांकडून संयुक्त कारवाई करण्यात आली. यामध्ये अवैधरित्या उपसा करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य 2 टिप्पर, 4 हायवा, 2 पोकलेन मशिनसह एकूण 2 कोटी 27 लाख 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. पाथरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 3 आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली .
- परभणीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी अबीनाश कुमार यांना राहटी, त्रिधारा पाटी आणि सुकी हद्दीत अवैधरित्या वाळू उपसा करून वाळूची चोरी विरोधात कारवाई केली. 26 मे रोजी राहटी येथे छापा टाकत 1 पोकलॅन, 1 टिप्पर आणि रेती असा 70 लाख 1 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी कारवाई त्रिधारा पाटी येथे करण्यात अली. या कारवाईत पोलिसांनी 1 टिप्पर आणि रेती असा 3 लाख 2 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात 2 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच बरोबर मौजे सुकी येथे 25 मे रोजी कारवाई करत पोलिसांच्या पथकाने 277 ब्रॉस रेती जप्त केली.
लोकप्रतिनिधींच्या तक्रारी
पाथरी तालुक्यातील डाकू पिंपरी येथील अवैध वाळू उपसा प्रकरणी कंत्राटादारची मालमत्ता जप्त करून दंडात्मक कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे विधानपरिषद सदस्य आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे. तर सेलू व परभणी तालुक्यात झालेला रेती उपस्याची ईटीएसद्वारे मोजणी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचेच माजी आमदार विजय भांबळे यांनी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .
एकूणच यंदाचा वाळूचा मोसम परभणीकरांसाठी डोकेदुखीचाच राहिला असून पोलिस प्रशासनाच्या धडक कारवाया आणि दुसरीकडे महसूल प्रशासन कुठल्या कारणाने शांत राहिला असा प्रश्न सामान्यांना पडलाय.