दिल्ली : दत्तक घेतलेल्या मुलीसोबत हैवानी कृत्य केल्याची खळबळजनक घटना दिल्लीत उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला रुकरी येथून अटक केली आहे. आरोपी महिला पीडित मुलीची मामी आहे. महिलेला मुलगी नसल्याने घरकामात मदत करण्यासाठी तिने नणंदेच्या 7 वर्षाच्या मुलीला दत्तक घेतले होते. मात्र मुलगी काम करण्यास टाळाटाळ करत असल्याने महिला तिला मारहाण करत असल्याचे तिने पोलीस चौकशीत सांगितले. आवश्यक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला न्यायालयात हजर केले. तेथून तिची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आता पोलीस अधिक चौकशीसाठी तिची कोठडी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. रेणू असे आरोपी महिलेचे नाव असून, ती सफदरजंग रुग्णालयात परिचारिका आहे. महिलेसह तिचा पती आनंद कुमार आणि मुलगा जॉनीलाही पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी महिलेला स्वतःची मुलगी नाही. त्यामुळे तिने आपल्या नणंदेच्या मुलीलाच दत्तक घेतले होते. मात्र त्यानंतर मुलीसोबत महिलेसह तिच्या मुलाने हैवानी कृत्य सुरु केले.
पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार, महिला काही कारण नसतानाही तिला मारायची. उन्हाळ्यात गच्चीवर, तर हिवाळ्यात बाल्कनीत नग्न बसवायची. अनेकदा छोट्या-छोट्या चुकांसाठी आई चिमट्याने चटका द्यायची आणि मारहाण करत असे.
या मुलीच्या शरीरावर 18 ताज्या जखमा आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच अनेक मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत.
पीडित मुलीने सांगितले की, तिच्या भावाने तिला जळत्या निखाऱ्यावर बसवले, गरम भांड्यावर बसवले आणि यानेही तिचे समाधान झाले नाही, त्यानंतर तिच्यासोबत अश्लिल कृत्य करत तिच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत केली. हात बांधून पंख्याला लटकवले.
9 फेब्रुवारी रोजी मुलीला वेदना होत असल्याचे पाहून शिक्षकाने तिची विचारपूस केली असता संपूर्ण प्रकार शाळेत उघडकीस आला. यानंतर शिक्षकाने या प्रकरणाची माहिती सीडब्ल्यूसी आणि पोलिसांना दिली.
पीडित मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. या सर्व प्रकारामुळे मुलीला मानसिक धक्का बसला आहे. मुलीला बाल कल्याण समिती (CWC) च्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेत आरोपी महिलेच्या पतीची भूमिकाही तपासली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.