बिकानेर : राजस्थानमध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या आई-वडिलांनीच आपल्या साडेतीन महिन्यांच्या चिमुकलीला नाल्यात फेकल्याची घटना बिकानेरमध्ये घडली आहे. मुलीला नाल्यात फेकताना तेथे उपस्थित लोकांनी पाहिले. या लोकांनी नाल्यातून मुलीला बाहेर काढत वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच मुलीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी माता-पित्याला अटक केली आहे. आरोपींची पोलिसांनी चौकशी केली असता जे कारण समोर आले ते ऐकून पोलीसही चक्रावले. आरोपी पिता शाळा सहाय्यक पदावर कॉन्ट्रॅक्टवर नोकरी करतो. नोकरीत परमनंट होण्यासाठी टू चाईल्ड पॉलिसीमुळे अडथळा होऊ नये म्हणून चार मुलांचे आई-वडिल असलेल्या आरोपींनी आपल्या साडेतीन महिन्यांच्या मुलीला नाल्यात फेकले.
आरोपी बाईकवरुन आले होते. त्यांनी आपल्याकडील साडे तीन महिन्यांच्या मुलीला कुणाला काही कळायच्या आत नाल्यात फेकले आणि तेथून पळून गेले. उपस्थित तरुणांनी नाल्यात उडी घेत मुलीला बाहेर काढले. तिला वाचवण्यासाठी तरुणांनी प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच मुलीचा मृत्यू झाला होता.
यानंतर नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत या आरोपी दाम्पत्याला घटनास्थळापासून 20 किमी अंतरावर दियातरा गावात अटक केली.
आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी जे सांगतिले त्यानंतर पोलीसही हैराण झाले. आरोपी पिता झंवरलाल एका शाळेत सहाय्यक पदावर नोकरी करतो.
सध्या तो कॉन्ट्रॅक्टवर काम करतो. मात्र नोकरीत परमनंट होण्यासाठी टू चाईल्ड पॉलिसीनुसार दोनच मुले असावी असा नियम आहे.
मात्र या दाम्पत्याला चार मुले आहेत. तरीही डिसेंबरमध्ये त्याने नोकरीच्या ठिकाणी दोन मुले असल्याचे शपथपत्र दाखल केले. यामुळे त्याने मोठ्या मुलाला भावाला दत्तक दिले. तर सर्वात लहान साडेतीन महिन्यांच्या मुलीला नाल्यात फेकले.