कल्याण : एक्सप्रेसच्या तिकिटासाठी रांगेत उभे असलेल्या प्रवाशाला दलालांकडून मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरतील तिकीट आरक्षण केंद्रावर घटना घडली. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्रीच्या सुमारास ही मारहाण केल्याची घटना घडली. कल्याण रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत. संतोष राय असे मारहाण झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. राय हा मूळचा बनारसचा रहिवासी आहे. बनारला आपल्या गावी जाण्यासाठी तो तिकिटाच्या रांगेत उभा असताना ही घटना घडली. तत्काळ तिकीट मिळवण्यासाठी दलालांकडून तिकीट खिडक्यांसमोर एकापेक्षा जास्त दलाल उभे केले जातात. त्यामुळे प्रवाशांना तिकीट मिळत नाही. प्रवाशांनी दलालांविरोधात आवाज उठवल्यास या दलालांकडून दादागिरी आणि मारहाण करण्यात आल्याच्या अनेक घटना याआधी देखील कल्याण रेल्वे स्टेशन आरक्षण केंद्रात घडल्या आहेत.
कल्याणहून बनारसला जाण्यासाठी संतोष राय हा तरुण तीन दिवसापासून कल्याण आरक्षण केंद्रात रांगेवर उभा राहत आहे. पहिल्या दिवशी त्याचा 50 वा नंबर होता, तिकीट मिळाले नाही. दुसरा दिवशी त्याचा अकरावा नंबर होता, तरीही टिकत मिळाले नाही. परंतु तिकीट मिळणार या आशेने संतोष तिसऱ्या दिवशीही रांगेत उभा होता.
काल रात्री दलाल आले त्यांनी स्वतःचे नंबर लावायला सुरुवात केली. संतोष राय यांनी विरोध केला आणि व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला. मात्र दलालांकडून संतोष याला मारहाण करण्यात आली. त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून मोबाईलमधील व्हिडिओ डिलीट करण्यात आला. याप्रकरणी संतोष रायने कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
कल्याणहून परराज्यात जाण्यासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात कल्याण रेल्वे स्थानकावर वर्दळ असते. सामान्य प्रवाशाला तिकिटासाठी वणवण करावी लागते. अनेकदा तर पूर्ण दिवस तिकीट आरक्षण केंद्रावर रांगेत उभे राहावे लागते, तरीही तिकीट मिळत नाही. अनधिकृत दलालांकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण केले जाते.