कल्याण : भुसावळकडून मुंबईकडे येणाऱ्या पंजाब मेलच्या जनरल डब्यात प्रवाशांना लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धारधार हत्यारांचा धाक दाखवत आणि मारहाण करत जबरदस्तीने प्रवाशांचे मोबाईल आणि पैसे काढून घेतल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास भुसावळ ते कल्याण दरम्यान घडली आहे. याप्रकरणी प्रवाशांच्या तक्रारीवरून कल्याण रेल्वे पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कल्याण पोलिसांनी तपासासाठी भुसावळ रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला आहे.
काल रात्री 2 वाजण्याच्या सुमारास भुसावळकडून मुंबईच्या दिशेने पंजाबला मेल निघाली. भुसावळ स्टेशन दरम्यान मेलच्या इंजिनपासून दुसऱ्या जनरल डब्यात शिरलेल्या तीन आरोपींनी प्रवेश केला. ट्रेनमध्ये प्रवास करत असलेल्या आरोपींना शिवीगाळ करुन धमकावत त्यांच्याकडील पैसे आणि मोबाईल मागण्यास सुरवात केली. आरोपींना प्रवाशांनी विरोध करण्याचा प्रयत्न करताच या चोरांनी सहा ते सात प्रवाशांना मारहाण केली. मग त्यांचे मोबाईल आणि पैसे घेऊन आरोपी पसार झाले.
सर्व प्रवाशांनी कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलीस संघात गुन्हा दाखल केला आहे. काही प्रवासी जखमी असल्याने त्यांचे मेडिकल करण्यात येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या गुन्ह्यात तीन आरोपींचा समावेश असून, या तिन्ही आरोपींनी गाडीच्या डब्यातून दोन मोबाईल आणि 7,600 रुपये घेऊन पसार झाले. अजूनही याप्रमाणे डब्यातील काही लोकांना लुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या आरोपींनी गाडीत धुमाकूळ घातला. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. नंतर गुन्हा तपासासाठी भुसावळ रेल्वे पोलिसांकडे वर्ग करणार असल्याचे सांगितले. मात्र या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.