मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलुंड परिसरात रविवारी रात्री एका 30 वर्षांच्या तरुणाची पाच जणांच्या टोळक्याने हत्या केल्याने एकच खळबळ माजली. तंदुरी चिकनच्या पैशांच्या मुद्यावरून झालेल्या वादाचा असा भयानक शेवट झाला. अवघ्या 200 रुपयांमुळे एका तरूणाला त्याचा लाखमोलाचा जीव गमवावा लागला. अक्षय नार्वेकर असे मृत तरूणाचे नाव असून तो ठाण्यातील रहिवासी आहे. या हत्याप्रकरणातील 5 आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. मृत तरूण हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयात (सीएमओ) शिपाई म्हणून काम करत होता.
दोन तरूण ( अक्षय आणि त्याचा मित्र आकाश साबळे (३०)) हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली तेव्हा हे प्रकरण पहिल्यांदा उघडकीस आले. दोघांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र तेथे डॉक्टरांनी अक्षयला मृत घोषित केले तर आकाशची प्रकृती अजूनही गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितलं.
चिकन तंदुरीवरून वाद झाला, जीवावर बेतला
याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी FIR दाखल करून तपास सुरू केला. अक्षय आणि त्याचा मित्र आकाश हे दोघे रविवारी दुपारी ठाण्यातील किसन नगर भागातील एका रेस्टॉरंटमध्ये तंदुरी चिकन घेण्यासाठी गेले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. तेथे पार्सल मिळाल्यानंतर रेस्टॉरंटच्या कॅशिअरने त्यांना 200 रुपयांचे बिल दिले. मात्र त्या दोघांकडे रोख रक्कम नसल्याने, त्यांनी बिल पेमेंटसाठी कार्ड दिले. मात्र त्या हॉटेलमध्ये डेबिट / क्रेडिट कार्ड स्वाईप करण्याचे मशीन नव्हते, त्यामुळे कॅशिअरने त्यांना रोख रक्कमच देण्यास सांगितले. त्याच मुद्यावरून त्यांच्यात वाद झाला. अखेर वैतागलेल्या अक्षयने गुगल पे द्वारे 200 रुपयांचे पेमेंट केले, मात्र त्याला कॅशिअरचा नकार होता. त्यांच्यातील वाद वाढतच गेला, अखेर अक्षय आणि त्याच्या मित्राने त्या कॅशिअरला रेस्टॉरंट बंद पाडण्याची धमकी दिली, असे पोलिसांनी सांगितलं.
पैशांसाठी लाखमोलाचा जीव गमावला
या घटनेनंतर आरोपींपैकी एकाने थोड्या वेळाने अक्षयला फोन करून मुलंडमधील एका दुकानात भेटायाल बोलावले आणि तेथेही त्यांचा वाद सुरूच राहिला. तेव्हा आरोपींनी त्यांच्या आणखी ३-४ मित्रांना तिथे बोलावले. त्यांच्याकडे लोखंडी रॉड आणि चॉपर्स होते. वादा वाढल्यानंतर आरोपींनी अक्षय आणि त्याचा मित्र आकाश यांच्यावर लोखंडी रॉडने वार केले, तसेच त्यांच्या पोटातही शस्त्र खुपसले.
पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
या घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तोपर्यंत जखमींना उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात आणण्यात आलं होतं. डॉक्टरांनी जखमी दोघांपैकी अक्षयला मृत घोषित केलं आणि आकाशवर प्राथमिक उपचार करून सायन रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केलं. मुलुंड पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांविरुद्ध हत्या, कट रचणे, हत्येचा प्रयत्न या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. इम्रान मेहमुद खान (वय 27), सलिम मेहमूद खान (वय 29), फारुख बागवान (वय 38), नौशाद बागवान (वय 35) आणि अब्दुल बागवान (वय 40) यांना अटक केली. अटक करण्यात आलेले इम्रान आणि सलिम हे दोघे सख्ये भाऊ असून फारुख नौशाद आणि अब्दुल हे तिघेही सख्खे भाऊ आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. पाचही जणांना सोमवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्यांना ८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.