सांगलीत अवघ्या 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, स्थानिक आक्रमक, सार्वजनिक शौचालयाची तोडफोड

| Updated on: Oct 09, 2024 | 6:50 PM

सांगलीमध्ये एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर संतप्त नागरिकांकडून घटनास्थळी तोडफोड करण्यात आली आहे. नागरिकांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.

सांगलीत अवघ्या 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, स्थानिक आक्रमक, सार्वजनिक शौचालयाची तोडफोड
सांगलीत अवघ्या 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, स्थानिक आक्रमक, सार्वजनिक शौचालयाची तोडफोड
Follow us on

सांगलीमध्ये एका नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने आरोपी राहुल कांबळे याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर संजयनगर आणि परिसरातील नागरिकांनी अत्याचाराची घटना ज्या ठिकाणी घडली त्या सार्वजनिक शौचालयाची तोडफोड केली. तसेच आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी करत स्थानिक नागरिकांनी चौकात रस्ता रोको केला. सदर घटनेची माहिती समजतात सांगलीतील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे हे आपल्या फौजफाटासहीत घटनास्थली दाखल झाले. त्यावेळी संतप्त नागरिकांनी आरोपी राहुल कांबळे याला फाशीची शिक्षा व्हावी, ही अत्याचाराची केस फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावी, या आरोपी सोबत आणखीन कोण आहे का? याचीही माहिती पोलिसांनी घ्यावी, अशा मागण्या पोलिसांकडे केल्या.

ही घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी काही गांजाची झाडे सुद्धा आढळून आले आहेत. अत्याचार करणारा आरोपी सुद्धा त्याच ठिकाणी गांजा ओढत बसतो, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाचा परिसर हा गांजाचा अड्डा आणि गांजा निर्मिती केंद्र बनले आहे का? असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

आरोपीला अटक, पोलिसांचं आंदोलकांना आश्वासन

दरम्यान, घटनेनंतर आरोपी राहुल कांबळे याला तातडीने अटक करण्यात आली. त्याच्यावर बलात्कार, अत्याचार यासारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी पोलीस प्रयत्न करतील, अशी ग्वाही पोलीस निरीक्षक बयाची कुरळे यांनी आंदोलकांना दिली. तर संबंधित परिसरात सातत्याने असे प्रकार घडत आले आहेत. त्यामुळे अशा नराधमांवर कडक कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

संतप्त नागरिकांनी पोलिसांना दिले गांजाचे रोप

यावेळी संतप्त आंदोलकांनी गांजाचे रोपच पोलिसांना भेट देत या परिसरातील गांजा ओढणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली. तर रात्री रस्त्यावर बसणाऱ्या तरुणांच्या टोळक्यांवर कारवाईसाठी दोन पथके तयार करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे यांनी दिली आहे. तसेच आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन पोलिसांनी करत त्यांची समजूत घातली. त्यामुळे संबंधित परिसरातील तणाव निवळला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.