माणुसकी मेली ! आगीत उद्ध्वस्तझालेल्या घरात चोरट्यांचा डल्ला, चेंबूरमध्ये लाखोंचा ऐवज लुटला

| Updated on: Oct 08, 2024 | 10:26 AM

चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीमध्ये एका घराला दोन दिवसांपूर्वी भीषण आग लागली होती. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने प्रचंड खळबळ माजली.

माणुसकी मेली ! आगीत उद्ध्वस्तझालेल्या घरात चोरट्यांचा डल्ला, चेंबूरमध्ये लाखोंचा ऐवज लुटला
क्राईम
Image Credit source: social media
Follow us on

चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीमध्ये एका घराला दोन दिवसांपूर्वी भीषण आग लागली होती. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने प्रचंड खळबळ माजली. मृतांमध्ये 7 वर्षांच्या मुलीचा आणि 10 वर्षांच्या मुलाचाही समावेश होता. या घटनेमुळे त्यांच्या कुटंबावर शोककळा पसरली, परिसरातही हळहळ व्यक्त होत होती. गेल्या ५० ते ६० वर्षांपासून गुप्ता कुटुंबीय सिद्धार्थ कॉलनी परिसरात वास्तव्यास होते.

असा दु:खद प्रसंग कोणावरही येऊ नये अशीच भावना लोक व्यक्त करत होते. मात्र याचदरम्यान एक अतिशय घृणास्पद आणि माणुसकी वनवाचा प्रकार जगात अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी एक भयानक घटना तिथे घडली.

मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार

ज्या घरात हे अग्निकांड झालं, सात जणांचा मृत्यू झाला त्याच घरात चोरी झाल्याची भयानक घटना उघडकीस आली. गुप्ता यांच्या घराला आग लागली होती, ती विझवल्यानंतर तेथे आसपास काही अज्ञात व्यक्ती फिरत होत्या. त्यांच्यापैकी काही जणांनी गुप्ता यांच्या घरात प्रवेश केला. आणि त्या घरातील कपाट तोडून, त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 12-14 लाखांचा ऐवज लंपास लुटून नेला. नुकतंच ज्या घरात भीषण अग्निकांड झालं, ज्यामध्ये 7 जणांनी जीव गमावला त्याच घरात चोरी करण्यासारखा घृणास्पद कृत्य करण्यात आले. मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार पाहून माणुसकी नावाचा काही प्रकार जिवंत आहे की तोही गेला, असा प्रश्न पडत आहे.

या चोरीप्रकरणी गुप्ता यांच्या मुलीने चेंबूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. त्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. आगीच्या घटनेनंतर मृतांना तातडीने राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले होते. यावेळी त्यांच्या मृत्यूचा दाखला तयार करण्यासाठी आधारकार्डची गरज होती. यावेळी गुप्ता याची मुलगी वंदना हिने तिच्या मुलीला दुर्घटनाग्रस्त घरातील कपाटामधील आधारकार्ड घेण्यासाठी पाठवले होते. यावेळी घरातील कपाटातील तिजोरी तोडल्याचे तिच्या लक्षात आले. तिने लागलीच ही गोष्ट वंदना हिला सांगितली. त्या लगेच घटनास्थळी आल्या, तेव्हा तिजोरीतील दागिने आणि रोख रक्कम लुटल्याचे त्यांना समजले. त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत चोरीची तक्रार दाखल केली.

आगीत सात जणांचा मृत्यू

रविवारी चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीमध्ये असलेल्या चाळीतील एका दुमजली घराला पहाटेच्या दरम्यान आग लागली. या घराच्या तळमजल्यावर एक दुकान होते तर वर एक कुटुंब रहायचे. या दुकानाच्या इलेक्ट्रीक वायरिंग आणि सामनाला सुरुवातीला आग लागली. त्यानंतर ही आग पसरत गेली. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये 7 वर्षांच्या मुलीचा आणि 10 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. पॅरिस गुप्ता (7), मंजू प्रेम गुप्ता (30), अनिता प्रेम गुप्ता (39), प्रेम गुप्ता (30), नरेंद्र गुप्ता (10), विधी गुप्ता (15), गितादेवी गुप्ता (60) अशी मृत व्यक्तींचे नावे आहेत. दरम्यान, आगीत मृत्युमुखी पडलेल्या सात जणांच्या पार्थिवावर रविवारी रात्री ८ च्या पोस्टल कॉलनी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.