Pimpri-Chinchwad : भाजपाच्या माजी नगरसेविकेच्या पतीचा राडा, बिल्डरला बेदम मारहाण

| Updated on: Oct 19, 2023 | 10:47 AM

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आवारात हा गोंधळ सुरू होता. माजी नगरसेविकेच्या पतीने बिल्डरला बेदम चोप दिला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

Pimpri-Chinchwad : भाजपाच्या माजी नगरसेविकेच्या पतीचा राडा,  बिल्डरला बेदम मारहाण
Follow us on

पिंपरी चिंचवड | 19 ऑक्टोबर 2023 : पिंपरी- चिंचवड (Pimpri-Chinchwad ) महानगरपालिकेच्या आवारात घडलेल्या एका घटनेमुळे चांगलाच गदारोळ माजला होता. रस्त्यावरील मारामारीचे लोण महापालिकेपर्यंत पोहोचल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. महापालिकेच्या आवारातच मारामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविकेच्या पतीने बिल्डरला बेदम चोप दिला. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

भाजपच्या माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांचे पती नितीन बोऱ्हाडे यांनी बुधवारी संध्याकाळी महापालिकेच्या आवारात, सर्वांसमोरच बिल्डर नरेश पटेल यांच्या अंगावर हात उचलत मारहाण केली. मात्र याबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

नितीन बोऱ्हाडे यांचे चुलते आणि नरेश पटेल यांची बोऱ्हाडेवाडीत जमीन आहे. सर्व्हे नंबर 644 मध्ये दोघांची जमीन एकमेकांना लागून आहे. त्याच जमिनीतून डीपी मार्ग जातो, त्यावरून बोऱ्हाडे यांचे चुलते आणि पटेल यांच्यात सध्या वाद सुरू आहे. याप्रकरणी बुधवारी महापालिकेत सुनावणी होती. त्यानंतर संध्याकाळी नितीन बोऱ्हाडे आणि नरेश पटेल यांच्यादरम्यान वाद सुरू झाला.

बघता बघता भांडण चांगलंच पेटलं आणि ते हातघाईवर आले. नितीन बोऱ्हाडे यांनी आधी पटेलांच्या कानशिलात लगावली , नंतर त्यांना लाथही मारली. ही मारहाण पाहून पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने धाव घेत बोऱ्हाडे यांना रोखलं अन प्रकरण तिथंच निवळलं. पण हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

एकमेकांवर आरोपाच्या फैरी

यानंतर बोऱ्हाडे आणि पटेल हे दोघेही एकमेकांवर आरोप करताना दिसले. तुम्ही न्यायालयात जा अथवा कुठं ही जा, मला फरक पडत नाही, असं नरेश पटेल माझ्या चुलत्याला बोलले, असा आरोप बोऱ्हाडे यांनी केला. त्यांचं हे वर्तन आणि बोलणं दोन्ही शोभणारं नव्हतं, त्याचाच राग आला आणि माझ्याकडून हे वर्त घडल असं बोऱ्हाडे यांनी स्पष्ट केलं. पण मी असतं काहीच बोललो नाही, उलट डीपी नुसार मार्ग होऊ द्या. त्यानुसार झाल्यास मलाच फायदा होणार होता. त्यामुळं बोऱ्हाडे यांनीच न्यायालयात जाण्याची भाषा वापरली, असा दावा नरेश पटेल यांनी केला केला.

खरं तर मार्ग कोणाच्या जागेतून किती जाणार आहे ? त्यातून कोणाचा फायदा अन कोणाचा तोटा होणार आहे ? हा विषय वेगळा आहे. पण बोऱ्हाडे यांनी सर्वांदेखत पटेल यांच्यावर हात उचलत अशी मारहाण करणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.