डेटिंग ॲपवर मुलीने फसवलं, त्याने थेट अयोध्येतील मंदिरच केलं टार्गेट

| Updated on: Feb 07, 2024 | 10:13 AM

डेटिंग ॲपच्या माध्यमाचा वापर गेल्या काही वर्षांत बराच वाढला आहे. मात्र अशा ॲप्समुळे काही वेळा फसवणूक होण्याचा धोकाही असतो. असाच एक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे, मात्र त्यापुढे जे घडलं ते अधिक धक्कादायक होतं.

डेटिंग ॲपवर मुलीने फसवलं, त्याने थेट अयोध्येतील मंदिरच केलं टार्गेट
Follow us on

मुंबई | 7 फेब्रुवारी 2024 : डेटिंग ॲपच्या माध्यमाचा वापर गेल्या काही वर्षांत बराच वाढला आहे. मात्र अशा ॲप्समुळे काही वेळा फसवणूक होण्याचा धोकाही असतो. असाच एक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे, मात्र त्यापुढे जे घडलं ते अधिक धक्कादायक होतं. डेटिंग ॲपवरच्या मुलीने फसवलं या रागातून एका तरूणाने अयोध्येतील मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा फोन केल्याचे उघड झाले आहे. सोहम पांडे असे आरोपीचे नाव असून मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सोहम यानेच मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला धमकीचा हा फोन केला होता. हा फोन कॉल करुन आरोपी पांडेने अयोध्या मंदिर बॉम्बने उडवून देण्याची तयारी करण्यात आल्याचे सांगत दोन व्यक्तींचे नंबर दिले होते.मात्र त्यापैकी एक नंबर हा सोहेल कुरेशी नावाच्या तरुणाचा होता. अखेर याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत आरोपी सोहम पांडे याला अटक केली. त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली.

आरोपी सोहम याची डेटिंग ॲपवर एका मुलीशी ओळख झाली. तिने त्याला आग्रा येथे भेटायला बोलावले होते, मात्र सोहम तिथे गेल्यानंतर ती मुलगी तेथे तिच्या मित्रांसोबत आली. तिथे तिने सोहमची फसवणूक करत त्याला लुटले आणि फरार झाली. याच गोष्टीचा राग आल्याने, त्यांना अडकवण्यासाठी सोहम याने हा खोटा कॉल केल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

अयोध्येतील राम मंदिरावर हल्ला करण्यात येणार आहे, असा कॉल मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला काही दिवसांपूर्वी आला होता, त्यानंतर सर्व यंत्रणा अलर्ट झाल्या. त्याची माहिती सर्व सिस्टिम्सना देण्याच आली. कॉल करणाऱ्याने दिलेल्या मोबाईल क्रमांकावरून यंत्रणांनी त्याचा शोध सुरू केला. कंट्रोल रूमला फोन करून आरोपी सोहम पांडेने माहिती दिली. सोहेल कुरेशी नावाचा व्यक्ती राम मंदिरावर हल्ला करणार असल्याचे त्याने सांगितले होते. आग्रा ते मुंबईला जात असताना ही माहिती मिळाल्याचे सोहमने सांगितले. तसेच त्याने पोलिसांना कुरेशीचा मोबाईल नंबर आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांचा मोबाईल नंबर देखील दिला. याची माहिती सर्व यंत्रणांना देण्यात आली.

मात्र याचा अधिक तपास केल्यानंतर हल्ल्याच्या बातमीत तथ्य नसल्याचे पोलिसांसमोर आले. अखेर पोलिसांनी सोहमचा नंबर ट्रेस करून त्याला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. डेटिंग ॲपवर झालेल्या फसवणूकीचा बदला घेण्यासाठी त्याने हा खोटा कॉल केला होता.