सांगली : इस्लामापूर पोलिसांचं एक पथक रात्री गस्तीवर असताना तीन भामटे मालवाहू एसटीतील डिझेल चोरी करत असल्याचे त्यांच्या निदर्शसान आलं. पोलिसांनी तीनही आरोपींना रंगेहाथ पकडलं. विशेष म्हणजे एसटी चालक नागेश रुपचंद्र धनवडे हाच या प्रकरणातला मुख्य चोर असल्याचं उघड झालं. पोलिसांनी त्याच्यासह त्याचा मित्र अमित धनवडे याला बेड्या ठोकल्या. तर त्यांचा मित्र आणि तिसरा सहकारी राजेंद्र धनवडे हा पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलीस त्याचाही शोध घेत आहेत.
एसटी चालक नागेश धनवडे याला इस्लामपूर एमआयडीसी ते वाई एमआयडीसी येथे माल वाहतुकीच्या एसटीवर नेमले होते. चालक नागेश धनवडे याने इस्लामपूर आगारातील पेट्रोल पंपातून एसटीची डिझेलची टाकी पूर्ण भरुन घेतली होती. शनिवार (7 ऑगस्ट) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास इस्लामपूरहून मालवाहतूक करण्यासाठी एसटी घेवून निघाला. पेठनाका येथील वाघवाडीकडे जाणार्या सर्व्हिसरोडवर एसटी चालक नागेश धनवडे याने एसटी थांबवली. त्यावेळी त्याचे मित्र अमित धनवडे आणि राजेंद्र धनवडे हे हुंडाई कार घेऊन थांबले होते.
आरोपी एसटीतील डिझेल एका पाईपने कारमध्ये ठेवलेल्या कॅनमध्ये काढत होते. दरम्यान इस्लामपूर पोलीस ठाण्याचे रात्रगस्ती पथक त्या मार्गावरुन जात होते. यावेळी पोलिसांनी एसटी थांबल्याचे पाहिले. पोलिसांनी पाहणी केली असता एसटीतून डिझेल चोरी सुरु असल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एसटी चालक नागेश धनवडे आणि अमित धनवडे यांना ताब्यात घेतले. या दरम्यान राजेंद्र धनवडे हा घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी ठरला.
एसटीच्या डिझेल टाकीत 190 लिटर डिझेल होते. यापैकी चोरट्यांनी 5427 रुपयांचे 60 लिटर डिझेल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. एसटी, हुंडाई कार, डिझेलचे कॅन पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. याबाबतची फिर्याद इस्लामपूर आगाराच्या सहायक वाहतूक अधिक्षक सुनंदा देसाई यांनी दिली आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा :
अश्लील वर्तनाचा तिटकारा, नागपुरात तरुणाकडून मित्राची हत्या
तेरी मौत का बदला, एक के बदले चार मारके लेंगे, युवा नेत्याच्या हत्येनंतर गँगस्टरचा इशारा