सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 15 नोव्हेंबर 2023 : वाढता वाढता वाढे.. कल्याण शहरातील गुन्हेगारीच्या घटनांबद्दल हीच परस्थिती सध्या दिसत आहे. चोरी, लूट, पाकिटमारी, हल्ला.. एक ना दोन.. विविध गुन्ह्यांच्या घटनांमुळे सामान्य नागरिक अक्षरश: हैराण, पण गुन्हे काही कमी होत नाहीत. काही दिवसांपूर्वीच नशेसाठी रस्त्यावरील नागरिकांना मारहाण करणाऱ्या आणि लुटणाऱ्या दोन आरोपींनी हैदोस घातला होता. कल्याण पश्चिम येथील शिवाजी चौक ते पत्री पूल दरम्यान असलेल्या चार्ली हॉटेल जवळ एका व्यापाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. चोरट्यांनी त्याला चोप देऊन त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन पर्स व पैसे लुटले आणि ते फरार झाले. त्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अचक केली होती.
मात्र ही घटना थंडावते ना थंडावते तो कल्याण स्टेशन परिसरात नवा कारनामा झाला आहे. स्टेशन परिसरात चाकूचा धाक दाखवून मारहाण करत लुटणाऱ्या दोन आरोपीना कल्याण महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मायकल शेख ,काजोल पाटील अशी अटक आरोपींची नावे असून यांचे दोन साथीदार अजूनही फरार असून त्यांचा शोध महात्मा फुले पोलीस घेत आहे. विशेष म्हणजे या टोळीत महिलांचाही समावेश असून त्यांच्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. दोघांना अटक झाली असली तरी उर्वरित आरोपी अजूनही फरार असल्याने पोलिस त्यांच्या मागावर आहेत.
अंधाराचा फायदा घेत चौघांची प्रवाशाला मारहाण
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात गर्दुल्ले ,मद्यपी, वारांगनांचा सर्रास वावर असल्याने नागरिकांचे डोकेदुखी वाढली. गर्दुल्ल्यांकडुन अनेकदा नशेत प्रवाशांना मारहाण केली जाते, त्यांना लुबाडण्यातही येते. अशा अनेक घटना वारंवार घडल्याने सामान्य नागरिक जीव मुठीत धरून स्टेशन परिसरातून प्रवास करतात. अशीच एक घटना काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष केसरी नावाचा 27 वर्षीय प्रवासी आपल्या गावी उत्तर प्रदेशात जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात आला. मात्र भूक लागल्याने तो हॉटेल शोधत परिसरातील स्काय वॉकच्या जिन्याखालून जात होता.
तेवढ्यात अंधाराचा फायदा घेत चार जणांच्या टोळक्याने संतोष याला हटकलं आणि चाकूचा धाक दाखवत, मारहाण करत त्याच्याकडचे 18 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून फरार झाले. या टोळीमध्ये दोन पुरुषांसह दोन स्त्रियांचाही समावेश होता. याप्रकरणी संतोष याने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण महात्मा फुले पोलिसांनी कल्याण स्टेशन परिसरात सापळा रचत अवघ्या काही तासांतच या टोळीतील दोघांना अटक केली. मायकल शेख आणि काजोल पाटील अशी दोन आरोपींची नावे आहेत, मात्र त्यांचे जोडीदार असलेले आणखी एक पुरूष आणि महिला अद्याप फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी कसून चौकशी करण्यात येत असून त्यांनी अशा प्रकारे किती गुन्हे केले आहेत याचा तपासही सुरू आहे.