Crime News : राज्यातील चोरी, गुन्ह्यांच्या घटनांच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातही पोलिसांना एक बाईक चोरी (bike theft) झाल्याची सूचना मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि बाईक चोरी करणाऱ्या टोळीलाच त्यांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल 17 बाईक्स जप्त केल्या असून तीन आरोपींना अटक (3 arrested) करण्यातही त्यांना यश मिळालं आहे. राजुरा पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे.
खरंतर ७ सप्टेंबर रोजी राजुरा ठाणे क्षेत्रात राहणाऱ्या एका तरूणाने पोलिसांत जाऊन बाईक चोरी झाल्याची तक्रार नोंदवली होती. प्रॅक्टिससाठी तो शाळेत गेला असताना, त्याने बाईक बाहेर पार्क केली होती. मात्र परत आल्यानंतर बाईक तेथे नसल्याचे त्याच्या लक्षात आले आणि त्याने पोलिस स्थानकात चोरीची तक्रार नोंदवली.
बाईक चोरणाऱ्या तिघांना पोलिसांनी केली अटक
यानंतर राजुरा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. त्यांनी पोलिसांची दोन पथके तयार केली आणि अवघ्या २४ तासांच्या आतच राजुरा उपविभागात वाहन चोरी करणाऱ्या टोळीला पकडले. त्यांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 17 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. गर्दी असलेल्या विशिष्ट ठिकाणी टेहळणी करून ते वाहनावर लक्ष ठेवायचे आणि संधी मिळताच बाईक चोरायचे. जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या बाईक्स ते दुसरीकडे नेऊन विकायचे, असेही आरोपींनी सांगितले.पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.