दादर… पहाटेचे ५ वाजलेले असोत की मध्यरात्रीची वेळ.. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला जोडणारे हे महत्वाचे स्थानक सदैव गजबजलेले असते. लाखो प्रवासी येथून दररोज प्रवास करतात. हेच दादर स्टेशन उडवून देऊ, अशी धमकी देणारा फोन मध्यरात्रीच्या सुमारास आला आणि एकच खळबळ माजली. काल मध्यरात्री 112 या हेल्पवालाइवर एका अज्ञात इसमाने फोन करून दादर रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी दिली.
हा कॉल येताच पोलीस सतर्क झाले आणि त्याने वेळ न गमावता तातडीने BDDS पथकासह दादर रेल्वे स्टेशन पिंजून काढत कसून तपासणी केली. मात्र कोठेही कोणतीच संशयास्पद वस्तू आढळली नाही आणि पोलिसांनी सुखाचा श्वास घेतला. दरम्यान हा धमकीचा कॉल करणाऱ्या व्यक्तीचाही पोलिसांनी शोध घेतला. विकास शुक्ला नावाच्या इसमाने कॉल करून ही धमकी दिल्याचं तपासात उघड झालं आहे. वसईच्या पेल्हार पोलिसांनी आरोपी विकास शुक्ला याला ताब्यात घेतलं आहे. त्याने हा धमकीचा कॉल का केला, त्याचा हेतू काय, त्याच्यासोबत आणखी कोणी साथीदार आहेत का या सर्व बाबींची पोलिस कसून तपासणी करत आहेत.
याआधीही आले होते धमकीचे फोन
यापूर्वीही अनेक वेळा दादर रेल्वे स्थानकात स्फोट घडवण्याची धमकी मिळाली होती. साधारणत: वर्षभरापूर्वी डिसेंबर महिन्यात मुंबईच्या कुर्ला, दादर, सीएसटी येथे बॉम्ब हल्ला करण्याची धमकी फोनवरून देण्यात आी होती. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील 112 क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने फोन करून या तीन ठिकाणी बॉम्ब हल्ले करण्याची धमकी दिली होती.
सतर्क झालेल्या मुंबई पोलिसंनी तांत्रिक तपास करून फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता तो औरंगाबादमधील वाळूज येथील असल्याची माहिती समोर आली होती. दारूच्या नशेत आरोपीने कॉल केल्याचे निष्पन्न झाले होते.