सिनेमात काम मिळत नव्हतं… पोलीस बनून यायचा आणि मोठा हात मारायचा; अखेर अभिनेत्याला अटक

| Updated on: May 29, 2024 | 11:20 AM

बॉलिवूडच्या एखाद्या थ्रिलर चित्रपटाची स्क्रिप्ट शोभेल अशी एक खळबळजनक घटना मुंबईत घडली आहे. वळीव पोलिसांनी एका 32 वर्षांच्या महत्वाकांक्षी अभिनेत्याला अटक केली आहे. त्याचा गुन्हा काय हे वाचाल तर तुम्ही देखील चक्रावून जाल.

सिनेमात काम मिळत नव्हतं... पोलीस बनून यायचा आणि मोठा हात मारायचा; अखेर अभिनेत्याला अटक
Follow us on

बॉलिवूडच्या एखाद्या थ्रिलर चित्रपटाची स्क्रिप्ट शोभेल अशी एक खळबळजनक घटना मुंबईत घडली आहे. वळीव पोलिसांनी एका 32 वर्षांच्या महत्वाकांक्षी अभिनेत्याला अटक केली आहे. त्याचा गुन्हा काय हे वाचाल तर तुम्ही देखील चक्रावून जालं. बॉलिवूडमध्ये नशीब चमकलं नाही, काम मिळाल नाही म्हणून त्याने त्याच्या अभिनय कलेचा वापर करत, पोलिस असल्याचं भासवत अनेक लोकांना लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून त्या गुन्ह्याअंतर्गतच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. फैझुल हसन शेख असं आरोपीचं नाव असून त्याने पोलिस अधिकाऱ्यांच्या देहबोलीचा अभ्यास करत तसाच अभिनय करून आपण स्वत: पोलिस असल्याचं भासवलं आणि त्यानंतर अनेक गुन्हे केले. त्यामध्ये खंडणी, चोरी आणि अफरातफरी अशा गुन्ह्यांचाही समावेश आहे. अनेक लोकांना फसवणाऱ्या या भामट्याला अखेर पोलिसांनी इंगा दाखवलाच आणि त्याची गजाआड रवानगी झाली.

अभिनयाचं स्वप्न उराशी बाळगून आला पण..

मिळालेल्या माहितीनुसार, फैझुल शेख याला अभिनयाची आवड असून तो बॉलिवूडमध्ये करीअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून होता. मात्र मनोरंजन सृष्टीत काम करण्याचं त्याचं स्वप्न काही पूर्ण होऊ शकलं नाही आणि तो हळूहळू गुन्हेगारी मार्गाकडे वळला. दुकानदारांकडून खंडणी उकळणे,पोलिस असल्याचं सांगून तपासाच्या नावाखाली दुचाकी तसेच मोबाईल पळवणे, असे अनेक आरोप त्याच्यावर लावण्यात आले आहेत. शेखने आपल्या दुकानातील मोबाईल चोरला अशी तक्रार वसईतील एका इलेक्ट्रॉनिक स्टोअरच्या मालकाने दाखल केली होती. त्यानंतर तपास करत पोलिसांनी अखेर सोमवारी त्याला अटक केली.

काम मिळालं नाही म्हणून ..

शेख हा पदवीधर असून होतकरू अभिनेता होता. ऑडिशन्ससाठा तयारी करताना त्याने विविध पोलिस अधिकाऱ्यांच्या देहबोलीचा, त्यांच्या वागण्याचा अभ्यास केला होता. पोलिस स्टेशनमधील अधिकारी तसे बोलतात, चालतात, वागतात या सगळ्याचं तो निरीक्षण करायचा. एकीकडे बॉलिवूडमध्ये काम मिळवण्याचे त्याचे प्रयत्न सुरू होते, पण त्यात त्याला काही यश मिळत नव्हते. अखेर वैतागून त्याने दुसरा मार्ग निवडला. ऑडिशनला जाण्यासाठी त्याने पोलिसांचा गणवेश विकत घेतला होता, त्याचाच वापर करून तो दुकानदारांकडून खंडणी वसूल करू लागला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची सही असलेली,  एका विशिष्ट पोलिस ठाण्यात रुजू झाल्याची बनावट लेटर्स दाखवून त्याने ही फसवणूक सुरू केली. वळीव पोलिसांकडे या बनावट पोलिसाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या, त्यामुळे त्यांना स्टिंग ऑपरेशनची योजना आखली आणि तोतया पोलिसाला रंगेहात पकडले. सोमवारी शेखने वसईतील इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात जाऊन पेमेंटचा पुरावा म्हणून बनावट ऑनलाइन मनी ट्रान्सफर मेसेज दाखवून १.६ लाख रुपयांचा फोन चोरला.

मात्र त्या दुकानदाराने त्याचं अकाऊंट चेक केलं असता कोणतेही पैसे क्रेडिट झाले नाहीत, असे त्याच्या लक्षात आले आणि त्याने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांचा गणवेश घालून चोरीच्या मोटारसायकलवरून बाहेर पडत असताना पोलिसांनी शेखला पकडले. त्यानंतर त्याच्या विरार येथील घराची झडती घेतली असता, मिरा-भाईंदर, वसई-विरार विभागातील विविध पोलिस ठाण्यांममधील ३० हून अधिक बनावट जॉईनिंग लेटर्स तिथे सापडली.

केला खोटा दावा

आपले सासरे पोलिस निरीक्षक असल्याचा खोटा दावाही शेखने केला होता. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून पोलिसांचे तीन गणवेश, बनावट ओळखपत्र, हातकडी, पोलिसांची एक टोपी आणि इतर संबंधित वस्तू जप्त केल्या आहेत. शेखला फसवणूक, बनावट कागदपत्रे आणि फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे, असे वालीव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सय्यद जिलानी यांनी सांगितले.