यवतमाळ / विवेक गावंडे : सशस्त्र दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरोडा टाकण्यापूर्वीच पोलिसांनी सापळा रचून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून देशीकट्टा, जिवंत काडतूस, दोन धारदार चाकू, हॉकी स्टिक, स्विफ्ट कार, दुचाकी असा मुद्देमालही जप्त करण्यात आला. अवधूतवाडी पोलिसांनी येथील जाजू चौक परिसरात ही कारवाई केली. मात्र, यावेळी टोळक्याचा एक साथीदार पसार होण्यात यशस्वी झाला. जगदीश रावल, गजानन राठोड, बाबू बडोदे, रोहन गरवारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर देवा वाघमारे असे त्यांच्या पसार झालेल्या साथीदाराचे नाव आहे.
एका स्विफ्ट कारने पाच जण यवतमाळात एक गंभीर गुन्हेगारी घटना घडवण्यासाठी फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. अवधूतवाडी ठाण्यातील पोलीस कर्मचारी बलराम शुक्ला यांना खबऱ्याकडून ही माहिती मिळाली होती. शुक्ला यांनी ही माहिती अवधूतवाडीचे ठाणेदार मनोज केदारे यांना दिली. यानंतर पोलीस पथकाने परिसरात सापळा रचला.
पोलिसांनी जाजू चौकात ते वाहन पकडले आणि संबंधित चौघांना शिताफिने ताब्यात घेतले. त्यानंतर त्या चौघांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे देशीकट्टा, जीवंत काडतूस, दोन धारदार चाकू, हॉकी स्टिक अशा शस्त्रांसह मुद्देमाल आढळून आला. शिवाय, त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट कार आणि दुचाकीही जप्त करण्यात आली. मात्र, यावेळी देवा वाघमारे हा टोळक्याचा साथीदार पसार होण्यात यशस्वी झाला. त्या चौघांना ताब्यात घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला.