बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या प्रचंड चर्चेत आहे. सलमान खानचा जवळचा मित्र असलेले राजकारणी बाबा सिद्दीकी यांची सुमारे महिन्याभरापूर्वी हत्या करण्यात आली. त्यानंतर सलमानलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून तो बिश्नोई गँगच्या रडारवर आहे. गेल्या आठवड्यातही त्याला धमकी मिळाली होती, त्याच्या सुरक्षिततेही वाढ करण्यात आली. मात्र त्यानंतर काल सलमानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली.
सलमान खानने माफी मागावी, अन्यथा त्याला जीवे मारण्यात येईल, असा धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळाला होता. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सलमानला धमकी देणाऱ्या एका तरूणाला अखेर अटक करण्यात आली आहे.
विक्रम असं अटक करण्यात आलेल्या तरूणाचं नाव असून तो 35 वर्षांचा आहे. पोलिसांनी कर्नाटकमधून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला होता. धमकी देणाऱ्याने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीवजा मेसेज दिला. मी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ बोलत आहे, असा दावा त्याने केला आहे. जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर त्याने आमच्या मंदिरात येऊन माफी मागावी, नाहीतर पाच कोटी रुपये द्यावे. नाहीतर त्याला जीवे मारू अशी धमकी देण्यात आली होती. अखेर त्या आरोपीला पोलिसांन कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास करत आहोत, त्या तरूणाचं बिश्नोई गँगशी काय कनेक्शन आहे याचाही शोध घेत आहोत असं पोलिसांनी नमूद केलं.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारालाही धमकी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथे तिघांन गोळीबार करून हत्या केली. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आत्तापर्यंत 14 ते 15 जणांना अटक केली असून मुख्य सूत्रधार झिशान अख्तर, शुभम लोणकर आणि मुख्य मारेकरी शिवकुमार यांचा अद्याप शोध सुरू आहे.
याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असतानाच एक मोठी अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला धमकीचा फोन आला आहे. याप्रकरणी तक्रारीच्या आधारे मुंबईतील खार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता, असे प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले. फोन करणाऱ्या आरोपीने 5 कोटी रुपयांची खंडणी ागितली आणि पैसे दिले नाहीत तर जीवे मारेन अशी धमकी दिल्याचं साक्षीदाराने सांगितलं. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
अनमोल बिश्नोईच्या आवाजाचे सँपल घेणार पोलीस , बाबा सिद्दीकी हत्येत हात असल्याचा संशय
दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत वाँटेड आरोपी अनमोल बिश्नोईचा सहभाग आहे का याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. शूटर विकी कुमार गुप्ता आणि वाँटेड आरोपी अनमोल बिश्नोई यांच्यातील संभाषणाच्या ऑडिओ क्लिपची (पेन-ड्राइव्हमधील) सॉफ्ट कॉपी प्रदान करण्याचे निर्देश मुंबई न्यायालयाने डायरेक्टरेट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅब (DFSL) ला दिले आहेत.
DFSL ही ऑडिओ क्लिप पेन ड्राईव्हमध्ये किशोर कुमार शिंदे, सहायक पोलिस आयुक्त, डीसीबी सीआयडी यांना प्रदान करेल आणि त्याची एक कॉपी स्वतःकडे ठेवणार आहे. “तपास करणाऱ्या एजन्सीला अटक आरोपी विक्कीकुमार गुप्ता (कथित शूटर) आणि वाँटेड आरोपी अनमोल बिश्नोई यांच्यातील संभाषणाची सॉफ्ट कॉपी हवी आहे. त्यामुळे, आरोपी विक्कीकुमार गुप्ता आणि वाँटेड आरोपी अनमोल बिश्नोई यांच्यातील संभाषणाच्या ऑडिओ क्लिपची सॉफ्ट कॉपी तपास यंत्रणेला प्रदान करण्यासाठी डीएफएसएलला निर्देश देण्यात आले आहेत, असे स्पेशल जज बीडी शेळके यांन नमूद केलं.
क्राइम ब्रांचकडे रेकॉर्डिंगचा फोन
14 एप्रिल रोजी शूटर गुप्तासहलदोघांनी सलमानच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटमधील घरावर गोळीबार केला. याप्रकरणी गुप्ता आणि सागर पाल या नेमबाजांना नंतर गुजरातमध्ये अटक करण्यात आली. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखेने यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले आहे, ज्यामध्ये गुप्ता सिग्नल ॲपच्या माध्यमातून वाँटेड आरोपी अनमोल बिश्नोईच्या संपर्कात असल्याचे त्यात नमूद करण्यात आलं होतं. आरोपी गुप्ता याने त्या संभाषणाची ऑडिओ क्लिप आपल्या भावाला पाठवली होती, जो या प्रकरणातील साक्षीदार आहे. या ऑडिओ क्लिपचे रेकॉर्डिंग असलेला भावाचा मोबाईल क्राईम ब्रँचने जप्त केला आहे. साक्षीदाराकडून जप्त केलेल्या मोबाईल फोन डेटाचे एक्सट्रॅक्शन आणि विश्लेषण डीएफएसएलने केले होते, गुप्ता आणि अनमोल बिश्नोई यांच्यातील संभाषणाच्या ऑडिओ क्लिपची सॉफ्ट कॉपी त्यांच्या ताब्यात आहे.