मुंबई | 9 फेब्रुवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवकावर झालेल्या गोळीबारामुळे संपूर्ण राज्य हादरलं. दहीसरमध्ये माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर याच्यावर मॉरिस भाई याने गोळीबार केला. त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. या दुर्दैवी घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी मेहुल नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. काल संध्याकाळी हा गोळीबार झाला तेव्हा मेहुल हा मॉरिससोबत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेनंतर मेहुल याचा शोध सुरू होता. अखेर रात्री उशीरा मेहुल पारेख याला ताब्यात घेण्यात आलं. या गोळीबारापूर्वी जे फेसबूक लाइव्ह करण्यात आलं होतं, त्यावेळी मॉरिस यांनी स्वत:च मेहुल इज हिअर, असं जाहीर केलं होतं. त्यावेळी मोबाईलच्या मागे मेहुल नावाची व्यक्ती होती, हे स्पष्ट झालं होतं. गोळीबाराच्या या घटननंतर मेहुल पारेख घटनास्थळावरून फरार झाला होता. अखेर रात्री उशीरा त्याला ताब्यात घेण्यात आलं.
मात्र ते फेसबूक लाइव्ह सुरू असताना, घटनास्थळी मेहुल नेमका काय करत होता, तो का आला होता तसेच या सगळ्या गोळीबाराच्या घटनेपूर्वी नेमकं काय काय झालं, याची माहिती मिळवण्यासाठी पोलिस मेहुलची चौकशी करत आहेत.
पोलिसांचा साडेसात तास पंचनामा
पोलिसांनी मॉरिस भाईच्या कार्यालयात गुरुवारी रात्री ९ पासून ते शुक्रवारी पहाटे ४.३० पर्यंत पंचनामा केला. यावेळी पोलिसांनी संपूर्ण पुराव्यांचे संकलन केले. जवळपास ७.३० तास चाललेल्या या पंचनाम्यात पोलिसांना एक पिस्तूल, जिवंत काडतुस आणि सीसीटिव्ही फुटेज हस्तगत केले. तसेच या प्रकरणाला राजकीय वळण असल्याने या प्रकरणाचा तपास बारकाईने केला जात आहे.
सीसीटीव्ही फुटजेही तपासले
गोळीबाराची ही संपूर्ण घटना आरोपी मॉरिस भाई याच्या कार्यालयातच घडली. त्यामुळे पोलिसांनी या कार्यालयातील तसेच बाहेरील सीसीटिव्हीच्या फुटेजचाही तपास सुरू केला आहे. तसेच येथे काही उपस्थित असलेल्या व्यक्तींकडून मृत मॉरिस आणि मृत अभिषेक यांच्या संदर्भातील जबाब नोंदवण्यात आले. सहपोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी हे दहिसर येथील मॉरिस भाईच्या कार्यालयात दाखल झाले. त्यांनी गोळीबारच्या घटनास्थळाची पाहणी केली. अधिकाऱ्यांना पंचनाम्याबाबत सूचना केल्या.
विरोधक संतापले
हत्येच्या या खळबळजनक घटनेनंतर विरोधी पक्ष संतापला असून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड तसेच विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना धक्कादायक असून राज्यातील एक नागरिक म्हणून प्रचंड चीड आणणारी आहे. एकामागून एक अशा गोळीबाराच्या घटना राज्यात घडत आहेत, इतकं सगळं होत असताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का ? ‘ अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला.
तर जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारवर कडाडून टीका केली. ‘महाराष्ट्राचा बिहार झाला, असे म्हणण्यात आता काहीच अर्थ उरला नाही. कारण, महाराष्ट्राने बिहारला खूप मागे सोडलं आहे. गुंडांनी जणू काही महाराष्ट्र आपल्या मुठीत बंदिस्त करून टाकला आहे. हतबल सरकार उघड्या डोळ्यांनी सारं काही पाहतंय. पोलिसांची दहशतच संपली आहे. पोलीस दलात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे पोलिसांनाही मर्यादा येत आहेत. पोलिसांवर फक्त विरोधकांना संपवण्याची जबाबदारी आहे; कायदा आणि सुव्यवस्था गेली खड्ड्यात !’ असे ट्विट करत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली