Mumbai Crime : भटक्या कुत्र्यांची काळजी घेणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्याला अटक

| Updated on: Oct 18, 2023 | 3:38 PM

रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांची काळजी घेत त्यांना खायला घालणाऱ्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी एका इसमाला अटक केली आहे. त्याने पीडित तरूणीला जीवे मारण्याचीही धमकी दिली होती. तसेच तिच्या पालकांनाही मारहाण केली.

Mumbai Crime : भटक्या कुत्र्यांची काळजी घेणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्याला अटक
Follow us on

मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांची काळजी घेत त्यांना खायला घालणाऱ्या एका महिलेचा विनयभंग (molestation) केल्याप्रकरणी पोलिसांनी एका इसमाला अटक केली आहे. अमन बनसोडे (वय 28) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बोरिवलीतील योगी नगर येथे ही धक्कादायक घटना घडली. आरोपी बनसोडे याने त्या महिलेला सामूहिक अत्याचाराची आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती, असेही समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षांची पीडित तरूणी ही बोरिवलीच्या योगीनगरमध्ये तिचे आई-वडील आणि भावासोबत राहते. गेल्या काही वर्षांपासून ती रोज रात्री 10.30 ते 11 च्या दरम्यान तिच्या भागातील रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना खायला देत असते. तेथे उभा असणारी टोळक्यातील काही मुलं तिल नेहमी चिडवायची, त्रास द्यायची, पण ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करायची, असे तिने पोलिसांना सांगितले.

वापरले अश्लील शब्द

मात्र 15 ऑक्टोबरच्या रात्री ही तरूणी रस्त्यावर कुत्र्यांना खायला घालत होती, तेव्हा आरोपी बनसोडे याने तिला उद्देशून अश्लील शब्द वापरत कमेंट केली. त्यावरून ती तरूणी त्याला जाब विचारण्यास गेली. मात्र तेव्हाच त्याने तिच्याशी गैरवर्तन केले आणि तिचे केस पकडले तसेच तिचा विनयभंग केला. एवढेच नव्हे तर त्याने तिला मारहाणही केली. मदतीसाठी ती तरूणी आरडाओरडा करू लागली.

तिचा आवाज ऐकून तरूणीचे आई-वडील आणि भाऊ मदतीसाठी बाहेर आले. तिची आई तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी बनसोडे याने तिच्या आईला मारहाण केली. तसेच बांबू घेऊन तिचा भाऊ आणि पालकांनाही बेदम मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने पीडितेला सामूहिक बलात्काराची आणि जीवे मारण्याची धमकीही दिली.

हा सर्व प्रकार तेथील एका व्यक्तीने मोबाईलवर रेकॉर्ड केला. त्यानंतर आसपासच्या परिसरातील नागरिक रस्त्यावर आले आणि त्यांनी मध्यस्थी करत हा प्रकार थांबवला.

पीडित तरूणीने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानंतर एम एच बी पोलीसांनी कारवाई करत बनसोडेविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. पुढील कारवाई सुरू आहे.