Dombivli Crime : चाकूचा धाक दाखवत ऑनलाइन पैसे लुटायचा, सराईत चोराला अखेर अटक

| Updated on: Dec 20, 2023 | 1:16 PM

भर रस्त्यात चाकूचा धाक दाखवत ऑनलाइन पैसे लुटणाऱ्या एक चोरट्यामुळेही अशीच खळबळ माजली. अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकत अटक केली. कल्याण क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. मात्र त्याचा साथीदार फरार आहे.

Dombivli Crime : चाकूचा धाक दाखवत ऑनलाइन पैसे लुटायचा, सराईत चोराला अखेर अटक
Follow us on

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 20 डिसेंबर 2023 : डोंबिवलीत गेल्या काही काळात भयानक गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिक दहशतीखाली जगत आहेत. भर रस्त्यात चाकूचा धाक दाखवत ऑनलाइन पैसे लुटणाऱ्या एक चोरट्यामुळेही अशीच खळबळ माजली. अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकत अटक केली. कल्याण क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. मात्र त्याचा साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

सनी तूसांबड असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याचा साथीदार अक्षय अहिरे पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या दोन्ही आरोपीच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून या दोघांनी अजून किती जणाला लुटले आहे याचा तपास आता पोलीस करत आहे

चिल्लाया तो काट डालेंगे, धमकी देत लुटले पैसे

पोलिसांनी यांसदर्भात अधिक माहिती दिली. डोंबिवली पूर्वेकडील बंदिश चौकातील कालीकामाता चाळीत राहणारे रणजित शंकर गलांडे मंगळवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास शेलार नाक्यावरून रिक्षाने घरी जाण्यासाठी निघाले. इतक्यात आरोपी सनी तुसांबड आणि त्याचा साथीदार अक्षय अहिरे या दोघांनी भर रस्त्यात रणजित यांना गाठले आणि त्यांच्या पोटाला चाकू लावला.
‘चिल्लाया तो काट डालेंगे’, अशी धमकी देऊन दोन्ही आरोपींनी रणजित यांचा 10 हजारांचा मोबाईल हिसकावून घेतला.

एवढेच नव्हे तर आरोपीने रणजितकडून त्यांच्या मोबाईलमधील गुगल-पे चा युपीआय आयडी आणि पिन नंबर मागितला. त्याआधारे त्याने रणजित यांच्या बँक खात्यातून 12 हजार रुपये काढून
घेतले. त्यानंतर दोन्ही आरोपी तेथून लागलीच पसार झाले. रणजित गलांडे यांनी याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

याच दरम्यान क्राईम बॅचच्या कल्याण युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरू केला. पोलीस कर्मचारी विश्वास माने आणि गुरूनाथ जरग यांना सनी तुसांबड हा पश्चिम डोंबिवलीतील बावन्न चाळ परिसरातील रेल्वे ग्राऊंडवर येणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस अधिकारी संदीप चव्हाण, संजय माळी, कर्मचारी विश्वास माने, बापुराव जाधव, गुरूनाथ जरग यांच्या पथकाने तत्काळ सापळा रचत सनी तुसांबड याला अटक केली. मात्र त्याचा साथीदार अक्षय अहिरे हा पसार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. सनी तुसांबड आणि अक्षय अहिरे हे दोघेही सराईत गुन्हेगार असून या दोघा विरोधात विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.