नवऱ्याने दुसरं लग्न केलं, मुलांची फी भरण्यासाठी चोरली सोन्याची चेन, अखेर तिला..

| Updated on: Aug 14, 2024 | 1:04 PM

नवऱ्याने दुसरी बायको केली ,चार मुलांचा उदरनिर्वाह करायचा कसा ? तिने चोरीचा मार्ग पत्करला ,काही काळ छोटे मोठे काम करून आपल्या मुलांचे पालन पोषण करत होती .त्या दरम्यान तिला आजारपण जडले. 12 वीत शिकणाऱ्या मोठ्या मुलाची फी भरायची होती,त्यासाठी तिने लोकलमध्ये चोरीचा मार्ग निवडला.

नवऱ्याने दुसरं लग्न केलं, मुलांची फी भरण्यासाठी चोरली सोन्याची चेन, अखेर तिला..
Follow us on

पैसा.. माणसाला काहीही करायला लावू शकतो. आजच्या जगात पैशाशिवाय काही नाही, पैसा नसेल तर आपली म्हणणारी लोकंही पाठ फिरवतात, तिथे दुसऱ्यांची काय कथा ? त्यामुळेच लोकं वाममार्गाला लागतात.असंच काहीसं प्रकरण कल्याण स्थानकातही उघडकीस आलं आहे. 12 वीतल्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे नसल्याने अखेर त्या आईने चोरीचा मार्ग निवडला आणि लोकलमध्ये लोकांच्या चेन, मंगळसूत्र हिसकावू लागली. मात्र तिचा हा गुन्हा फार काळ पचला नाही. सीसीटीव्हीच्या आधारे कल्याण रेल्वे पोलिसांनी अखेर त्या महिला चोराला अटक केली आहे. राणी क्रांती भोसले असे तिचे नाव असून पोलिसांनी तिच्याकडून चोरी केलेले दागिने हस्तगत केले.

नवऱ्याने दुसरं लग्न केलं, संसार चालवण्यासाठी अखेर ती चोर बनली..

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर येथे राहणाऱ्या हिला तीन मुलं आणि एक मुलगी आहे. काही वर्षांपूर्वी राणीच्या पतीने तिला सोडून दुसरे लग्न केले. त्यानंतर चार मुलांचा उदरनिर्वाह कसा करायचा, त्यांना कसे सांभाळायचे या विवंचनेत ती होती. यातूनच तिने चोरीचा मार्ग पत्करला. या दरम्यान तिने हाताला मिळेल ते काम देखील केले. याच दरम्यान तिला आजार झाला. आजारावर उपचार करण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. म्हणून ती मुंबईला आली.

कल्याणला भावाकडे आली अन्…

कल्याण येथे विठ्ठलवाडी परिसरात राहणाऱ्या आपल्या भावाकडे आली. ती उपचारांसाठी औषध घेण्यासाठी मुंबईला जायची. दरम्यान 10 ऑगस्टला बारावीत शिकणाऱ्या तिच्या मुलाने फोन करत कॉलेजमध्ये फी भरण्याठी पैसे हवे असे सांगितले. त्यामुळे राणी चिंतेत होती. पैशांची गरज असल्याने तिने चोरी करण्याचा निर्णय घेतला. कल्याण- शहाड दरम्यान गर्दीचा फायदा घेत तिने लोकलमध्ये एका महिलेची चेन हिसकावली व स्टेशनवरून पळ काढला. मात्र महागडी चेन चोरी झाल्यानंतर महिलेने कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

गुन्हा दाखल होताच रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरु केला. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता यामध्ये तोंडाला स्कार्फ घातलेली एक महिला आढळून आली. पोलिसांना या महिलेवर संशय बळावला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या महिलेचा शोध सुरु केला. महिला विठ्ठलवाडी स्टेशनला उतरली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. विठ्ठलवाडी परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस तिच्या घरापर्यंत पोहोचले. पोलीस कर्मचारी लक्ष्मण कुटे यांच्या पथकाने या महिलेला अटक केली. तिने चोरी केलेले दागिने हस्तगत करण्यात आले. मुलाची फी भरण्यासाठी चोरीचा हा मार्ग पत्करल्याचं राणीने कबूल केलं.