सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. अपघाती मृत्यू पावलेल्या 3 वर्षीय लहान मुलीच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी जमीन खणून चिमुकलीचा मृतदेह काढला आहे. या घटनेमुळे सावंतवाडीच एकच खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकार नेमका काय आहे, असं का करण्यात आलं? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. पण पोलिसांनी मुलीचा मृतदेह शोधून काढला आहे. पोलिसांनी मृत मुलीच्या नातेवाईकांसमोर मुलीचा मृतदेह खणून बाहेर काढला आहे.
सावंतवाडी तालुक्यातील माळेवाड भागातील एका चिरेखाणीत 3 वर्षीय लहान मुलीचा अपघाती मृत्यू झाला होता. या मुलीच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करत मृतक मुलीचा मृतदेह शोधून काढला आहे.
संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तिथे माळरानावर पोलिसांना संशयास्पद गोष्टी आढळल्या. यावेळी पोलिसांनी शोध घेत 3 वर्षाच्या चिमुरडीचा दफन केलेला मृतदेह खोदून बाहेर काढला.
हा मृतदेह पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांना छत्तीसगडवरून बोलावून त्यांच्या समक्ष महसूल विभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. साधारणतः 15 दिवस या घटनेला झाले असल्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले. मुलीचे कुटुंब हे छत्तीसगडमधील आहे. हे कुटुंब सावंतवाडीत एका चिरेखाणीवर काम करत होते.