डोंबिवली : मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील प्रकरणात आपल्या वरिष्ठांनी सहकार्य केले आहे आणि ते यापुढे ही करतील. त्यासाठी 50 हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करणाऱ्या मानपाडा पोलीस (Manpada Police) ठाण्यातील पोलीस नाईक पदावरील कार्यरत असलेल्या नितिन राठोड विरोधात लाचखोरी (Bribe)चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस अधिक तपास (Investigation) करत आहेत.
काही दिवसापूर्वी मानपाडा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास मानपाडा पोलीस संघाचे पोलीस उपनिरीक्षक मुसळे यांच्याकडे आला. पोलीस उपनिरीक्षक मुसळे यांच्याकडे कार्यरत असलेला पोलीस नाईक नितिन राठोड हा लेखनिक असल्याने आरोपींशी त्याची गाठ भेट झाली.
यादरम्यान या गुन्ह्यातील आरोपीला आणि त्याच्या पत्नीला पोउपनि मुसळे यांनी सहकार्य केले आहे आणि ते यापुढेही सहकार्य करतील. मात्र त्यासाठी साहेबांना 50 हजार रुपये द्यावे लागतील, असेही सांगत तडजोडीअंती 40 हजार रुपये देण्याचा आरोपीकडे तगादा लावला.
काही कारणाने आरोपी व यांच्यातला व्यवहार झाला नाही. मात्र राठोड हे वारंवार तगादा लावत असल्याने आरोपीने याची तक्रार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली. या तक्रारीची प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक शहानिशा केली.
चौकशीदरम्यान पोलीस नाईक राठोड याने आरोपीकडे 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या विभागाने वरिष्ठाच्या नावाने पैसे मागणाऱ्या नितिन राठोड यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.