हिंगोली / रमेश चेंडके (प्रतिनिधी) : आरोपीला पकडण्यासाठी गेले असताना झालेल्या झटापटीत बंदुकीतून गोळी सुटली आणि त्यात पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहरात आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी त्याच्या घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस पथक घरी गेले होते. यावेळी आरोपीने पळण्याचा प्रयत्न केल्याने त्याला पकडताना झालेल्या झटापटीत चुकून एका पोलीस अधिकाऱ्याच्या ताब्यातील बंदुकीतून गोळी सुटली. त्यात दुसरा पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
कळमनुरी शहरातील इंदिरा नगर परिसरात 2021 मध्ये घडलेल्या एका गुन्ह्यात पोलिसांनी नऊ ते दहा जणांवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यानंतर अटकेची कारवाई टाळण्यासाठी आरोपी बबलुसिंग हत्यारसिंग टाकने पळ काढला होता. तेव्हापासून मागील वर्षभर तो फरार होता. तो त्याच्या घरी आल्याची गोपनीय खबर पोलिसांना मिळाली होती.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील कारवाई करण्याच्या हेतूने त्याच्या घराभोवती घेराव घातला आणि त्याला पकडण्यासाठी काही अधिकारी आज दुपारी त्याच्या घरात शिरले होते. यावेळी आरोपी टाकने पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस आणि टाकमध्ये झटापट झाली. त्यात पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या ताब्यातील बंदुकीतून चुकून गोळी सुटली आणि ती गोळी पोलीस उपनिरीक्षक शेख माजीद यांना लागली. माजीद यांना गंभीर दुखापत झाली असून, कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलवले आहे.
टाक हा काही दिवसांपूर्वीही त्याच्या घरी आला होता. त्यावेळी पोलिसांना गुप्त खबर मिळाली होती. त्यानुसार पोलीस रात्रीच्या सुमारास त्याला पकडण्यासाठी गेले होते. मात्र अंधाराचा फायदा घेत टाकने धूम ठोकली होती. घराच्या दिशेने पोलीस आल्याची कुणकुण लागताच त्याने पोबारा केला होता. बुधवारी दुपारी मात्र गोळीबाराची घटना घडूनही अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेण्यात यश मिळवले.
कळमनुरी शहरात गुरुवारपासून लमाणदेव येथील यात्रा सुरू होणार आहे. त्यानिमित्ताने कळमनुरी पोलीस दरवर्षी तगडा बंदोबस्त लावतात. याचदरम्यान मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. यावेळी चुकून गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.