22 जूनच्या रात्री चंदौली आणि वाराणसीच्या सीमेवर एका ज्वेलरी व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली होती. आरोपींनी व्यापाऱ्याकडून एकूण 42 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच आरोपींचा शोध सुरू केला. या प्रकरणात पोलिसांनी पाळत ठेवून आरोपी पोलीस निरीक्षक सूर्य प्रकाश पांडे आणि वाराणसी कँट पोलीस ठाण्यातील त्याच्या इतर दोन साथीदारांना अटक केली. या घटनेत सहभागी असलेल्या आरोपी निरीक्षकाची पोलिस कसून चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 22 जूनच्या रात्री आरोपी अजय गुप्ता बेकायदेशीर पिस्तुल घेऊन भुल्लनपूर बस स्थानकातून बसमध्ये चढला होता. पुढे काही अंतरावर बस तपासण्याच्या नावाखाली आरोपी पोलीस निरीक्षक सूर्यप्रकाश पांडे याने कटारिया पेट्रोल पंपाजवळ बस थांबवली. बस थांबवल्यानंतर पोलीस निरीक्षक पांडे याने अजय गुप्ता आणि बसमधील प्रवाशी व्यावसायिकाची चौकशी केली.
निरीक्षक सूर्यप्रकाश पांडे याने अजय गुप्ता याच्याकडे पिस्तुल असूनही त्याला सोडून दिले. मात्र, व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडील 42 लाख 50 हजार रुपये लुटले. त्या व्यावसायिकाने झालेल्या घटनेची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि आरोपी निरीक्षक सूर्यप्रकाश पांडे याला अटक केली.
पोलिसांनी अटक आरोपींकडून 8 लाख 5 हजार रुपये रोख, 32 बोअरची दोन पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि घटनेत वापरलेली एक दुचाकी जप्त केली. पोलीस निरीक्षक पांडे आणि त्याच्या सहकाऱ्यांची गुन्हा करण्याची वेगळी पद्धत होती. माहिती देणाऱ्याच्या माहितीवरून ते संशयास्पद वस्तूंच्या नावाखाली व्यापाऱ्यांना रोखत असत. क्राइम ब्रँचच्या पथक आहे असे सांगून ते व्यापाऱ्यांची झडती घेत. त्यांच्याकडून मिळालेल्या रकमेपैकी निम्मी रक्कम ते स्वतःकडे ठेवत आणि घटनेची माहिती कोणाला देत नसत. व्यापारी दबावाखाली येऊन कोणाशी काही बोलणार नाही हा त्यामागचा त्यांचा हेतू होता अशी माहिती पोलिसांनी दिली.