शिर्डी / मनोज गाडेकर : साई मंदिराचे सुरक्षारक्षक आणि भक्तांमध्ये मारहाणीची घटना शुक्रवारी घडली होती. पोलिसांनी भक्तांच्या तक्रारीवरून सुरक्षारक्षकाविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. यानंतर भक्तांना मारहाण न करण्याची तंबी पोलिसांनी साईबाबा संस्थानच्या सुरक्षारक्षकांना दिली आहे. मुंबईहून शिर्डीत रामनवमीच्या निमित्ताने पायी पालखी घेऊन येणारे साईभक्त आणि सुरक्षारक्षकात शुक्रवारी मारहाणीची घटना घडली होती. या मारहाणीचा व्हिडिओही प्रचंड व्हायरल झाला होता. या मारहाणीनंतर गुन्हा नोंदवत पोलिसांनी सुरक्षारक्षकांना तंबी दिली आहे.
मंदिर परिसरातून बाहेर पडलेल्या एका भक्ताला आपली पिशवी आत राहिल्याचं आठवल्यानंतर त्याने पाच नंबर गेटमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांनी मज्जाव केला आणि आत जाण्याच्या गेटमधून आत जाण्यास सांगितले. या कारणावरुन सुरक्षारक्षक आणि साईभक्त यांच्यात शाब्दिक वादावादी झाली आणी त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले.
सुरक्षारक्षकाने भक्तांना मारहाण केल्याने साईभक्तांच्या सुरक्षेसाठी हे रक्षक आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भक्ताच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलाय.
शिर्डीत भक्तांना मारहाणीची ही काय पहिली वेळ नाही. अनेकदा साईभक्तांना मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. देशविदेशातील साईभक्त शिर्डीत आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्याशी आदराने आणि विनम्रपणे बोलायला हवे, मात्र शिर्डीत चित्र उलटे आहे. भक्तांशी उद्धटपणे बोलल्याने अनेकदा असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे साईबाबा संस्थानने आपल्या कर्मचाऱ्यांना विनम्रता शिकवण्याची गरज आहे.