अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी प्रसिद्ध गायकाला अटक करण्यात आली आहे. भोजपुरी गायक बाबुल बिहारी उर्फ अभिषेकबाबत ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.
दोन वर्षांपूर्वी घडली घटना
२१ वर्षीय आरोपी हा बिहारचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अभिषेक याला बाबुल बिहारी म्हणून ओळखले जाते, आम्ही त्याला 8 जून रोजी गुरुग्राम येथून अटक केली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक उर्फ बाबुल बिहारी याची दोन वर्षांपूर्वी त्याच्या परिसरातील एका १३ वर्षीय मुलीशी ओळख झाली होती. त्यानंतर त्याने मुलीला फूस लावून राजीव नगर येथील एका हॉटेलमध्ये नेले. जिथे त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. अल्पवयीन मुलीने मात्र ही घटना कोणालाही सांगितली नाही. या घटनेनंतर त्या मुलीने आरोपीपासून अंतर ठेवले होते. इतके दिवस पीडितेच्या कुटुंबीयांनाही या घटनेची माहिती नव्हती.
सोशल मीडियावर पाहिले फोटो
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, काही दिवसांपूर्वी आरोपीने अल्पवयीन मुलीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. फोटो पाहिल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तिची विचारपूस केली, तिला काय झाले ते विचारले. त्यानंतर त्या मुलीने तिच्यासोबत काय घडले, हे सांगितले. तिच्या कुटुंबीयांनी ७ जून २०२३ रोजी पोलिसांशी संपर्क साधला.
अल्पवयीन मुलीचे समुपदेशन केल्यानंतर, सेक्टर 14 पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायदा आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला.