मुंबई : पुण्यातील पिंपरी येथील सेवा विकास सहकारी बँकेतील कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज मोठी कारवाई केली. व्यावसायिक, माजी उपमहापौर अमर मुलचंदानी, विवेक अरान्हा, सागर सुर्यवंशी, खेमचंद भोजवानी आणि त्यांच्या कुटुंबातील 121.81 कोटी रुपयांच्या 47 स्थावर मालमत्ता आणि 54.25 लाख रुपयांच्या जंगम मालमत्तांवर तात्पुरती जप्ती आणण्यात आली आहे. 2002 च्या पीएमएल कायद्यांतर्गत तरतुदीच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे. सेवा विकास सहकारी बँकेत तब्बल 429.6 कोटी रुपयांचा कर्ज गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.
ईडीने कर्ज गैरव्यवहारप्रकरणी रोझरी एज्युकेशन ग्रुपचे विनय अरन्हा आणि इतरांविरुद्ध विमंतल पीएस, पुणे येथे दाखल झालेल्या एफआयआरच्या आधारे पीएमएलए कायद्याखाली तपास सुरु केला. त्यानंतर संयुक्त निबंधकांनी (ऑडिट) संपूर्ण सेवा विकास सहकारी बँकेचे ऑडिट केले आणि 124 एनपीए कर्ज खात्यांमध्ये 429.6 कोटी रुपयांचा गंभीर गैरव्यवहार आणि अफरातफर झाल्याचे आढळून आले. त्या ऑडिट रिपोर्टच्या आधारे बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्यासह कर्ज लाभार्थी आणि बँक व्यवस्थापनाविरुद्ध अतिरिक्त एफआयआर दाखल करण्यात आला होता. या अनुषंगाने आरबीआयने बँकेचा परवाना रद्द केला आहे.
ईडीमार्फत संपूर्ण बैंक घोटाळ्याची कसून चौकशी केली आहे. बँकेच्या व्यवस्थापनाने मंजूर केलेल्या बेकायदेशीर कर्जाद्वारे हजारो ठेवीदारांच्या छोट्या ठेवी बुडवल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे.
मर्जीतल्या कर्जदारांना बेकायदेशीरपणे कर्ज मंजुरी
अमर मुलचंदानीने बँकेतील सार्वजनिक ठेवींना वैयक्तिक जामीन ग्राह्य धरले आणि बँकिंग नियमांचे उल्लंघन करीत मर्जीतल्या कर्जदारांना बेकायदेशीरपणे कर्ज मंजूर केले. कर्ज देताना त्यांची पतपात्रताही तपासली नाही. मंजूर कर्ज रक्कमेच्या 20 टक्के कमिशन घेऊन बेकायदेशीर कर्ज मंजूर केल्याचे तपासात उघड झाले आहे. अमर मुलचंदानी यांनी पैसे उकळण्यासाठी विविध बेनामी बोगस कर्जेही मंजूर केल्याचा आरोप आहे.
प्रमुख कर्ज थकबाकीदार विनय अरन्हा, सागर सुर्यवंशी आणि खेमचंद भोजवानी इत्यादींनी अमर मुलचंदानी यांच्याशी हातमिळवणी केल्याचा आरोप आहे. ईडीने अमर मुलचंदानी आणि इतरांनी केलेल्या अनेक बेनामी गुंतवणुकीचा शोध घेतला आहे.